आई-बाबा स्वतःसाठी आमच्यासाठी मास्क वापरा, शालेय विद्यार्थ्यांचे भावनिक आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:06 AM2021-02-27T04:06:09+5:302021-02-27T04:06:09+5:30

मुंबई : २०२० च्या डिसेंबरपासून कमी झालेला कोरोनाचा संसर्ग फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. याआधी ...

Parents use masks for themselves for us, the emotional appeal of school children | आई-बाबा स्वतःसाठी आमच्यासाठी मास्क वापरा, शालेय विद्यार्थ्यांचे भावनिक आवाहन

आई-बाबा स्वतःसाठी आमच्यासाठी मास्क वापरा, शालेय विद्यार्थ्यांचे भावनिक आवाहन

Next

मुंबई : २०२० च्या डिसेंबरपासून कमी झालेला कोरोनाचा संसर्ग फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. याआधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ अशी घोषणा देत कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले होते. आता मुख्यमंत्र्यांनी ‘मी जबाबदार’ या मोहिमेअंतर्गत स्वतःची जबाबदारी स्वतःच घेण्याचे आवाहन जनतेला केले आहे. आरोग्यमंत्र्यांनीदेखील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आई-बाबा बाहेर जाताना मास्क वापरातात का? सॅनिटायझर वापरतात का? बाहेरून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुतात का? असे पत्र आरोग्यमंत्र्यांनी शालेय विद्यार्थ्यांना पाठविले आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर मागील वर्षी मार्च महिन्यातच सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला. त्यामुळे वर्षभरात शालेय विद्यार्थ्यांनी घरात बसून ऑनलाइन अभ्यास केला. २०२१ मध्ये अनेक जिल्ह्यांतील शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र शाळेतील काही विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला. कोरोनाचा संसर्ग वाढलेला असताना आजही अनेक जण मुंबईत सार्वजनिक ठिकाणी विनामास्क वावरताना आढळून येत आहे. असे नागरिक आपल्या घरातील लहान मुलांचे तरी ऐकतील, या आशेने आरोग्यमंत्र्यांनी शालेय विद्यार्थ्यांना आपल्या पालकांना मास्क व सॅनिटायझरचा वापर करायला सांगण्याचे आवाहन केले आहे.

स्वतःची काळजी घ्या आणि आई-बाबांचीही काळजी घ्या

* प्रथम तुम्ही स्वतःची काळजी घ्या, तसेच आई-वडील, भाऊ-बहीण आणि शेजाऱ्यांचीही काळजी घ्या. वडीलधाऱ्या मंडळींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसलीच तर त्यांना तातडीने दवाखान्यात घेऊन जा. त्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.

* आई-वडिलांना कामानिमित्त बाहेर जावे लागते. बाहेर जाताना ते मास्क लावतात का? बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुतले जातात का? सॅनिटायझर वापरले का? हेदेखील पाहा, असा सल्ला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या पत्रातून शालेय विद्यार्थ्यांना दिला आहे.

१) आरुषी विकास सकपाळ (शालेय विद्यार्थिनी) - मी माझ्या आई-वडिलांना तसेच घरातील सर्व वडीलधाऱ्यांना नेहमी मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन करते. सरकारने कोरोना रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियम व अटींचे माझ्या घरातील सर्व व्यक्ती काटेकोरपणे पालन करतात.

२) रुजुल चंद्रशेखर गावडे (शालेय विद्यार्थिनी) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेतून आम्हाला दररोज काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येते. माझ्या घरातील सर्व व्यक्ती मास्क व सॅनिटायझरचा वापर करतात. मीदेखील माझ्या मैत्रिणींना काळजी घेण्यास सांगते.

३) प्रीती कदम (शालेय विद्यार्थिनी) - माझी आई पालिकेत काम करत असल्यामुळे आम्ही सुरुवातीपासूनच स्वच्छतेबाबत जागरूक आहोत. कोरोनाची भीती असल्याने मी माझ्या घरातल्या सर्वांना मास्क आणि सॅनिटायझर वापरायला सांगते.

४) साईशा डोके (शालेय विद्यार्थिनी) - माझे आई-वडील सतत मास्क व सॅनिटायझर वापरतात व मलादेखील वापर करायला लावतात. आता कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने घरातील सर्व जण अधिक काळजी घेत आहेत.

५) यश कटारनवरे (शालेय विद्यार्थी) - कोरोनाजन्य परिस्थितीतही माझे वडील काम करीत आहेत. अशा वेळी मी त्यांना सतत मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्यास सांगतो आणि मीदेखील सर्व प्रकारची काळजी घेतो. माझ्या घरातील सर्व व्यक्ती स्वतःची काळजी घेतात.

६) संचित तांबे (शालेय विद्यार्थी) - माझे आई-बाबा बाहेर जाताना नेहमी मास्क लावून जातात. मीसुद्धा मास्क व सॅनिटायझरचा नेहमी वापर करतो. बाहेरून आल्यावर घरातील सर्व व्यक्ती साबणाने हात स्वच्छ धुतात. मी माझ्या मित्रांनादेखील याबाबत जागृत करतो.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागल्याने मुंबईकरांची चिंता वाढू लागली आहे. यासाठी गर्दीच्या ठिकाणी एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर राहील तसेच घराबाहेर पडताना चेहऱ्यावर सतत मास्क वापरला जाईल यासंदर्भात महानगरपालिकेतर्फे वेळोवेळी जनजागृती करण्यात येत आहे. नियम मोडणाऱ्यांवर महानगरपालिका कठोर कारवाईदेखील करीत आहे. पुन्हा लॉकडाऊन लागू नये यासाठी सर्व मुंबईकरांनी काळजी घेण्याचे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Parents use masks for themselves for us, the emotional appeal of school children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.