Join us

पार्किंगची ‘बेस्ट’ व्यवस्था

By admin | Published: July 18, 2014 12:58 AM

डोक्यावरील कर्ज कमी करण्यासह तोट्यात गेलेल्या बेस्टला नफ्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत

मुंबई : डोक्यावरील कर्ज कमी करण्यासह तोट्यात गेलेल्या बेस्टला नफ्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रशासनाने मुंबई शहर आणि उपनगरातील बेस्ट बसचे डेपो आणि टर्मिनस हे खासगी वाहनांना पार्किंगसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयासंबंधीचा प्रस्तावही बेस्ट प्रशासनाने तयार केला असून, बेस्ट समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर मुंबईकरांची पार्किंगची डोकेदुखी आणखी कमी होणार आहे.मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेवर ‘मुंबई एन्व्हायर्नमेंटल सोशल नेटवर्क’ संस्था काम करते. मुंबईत आठ लाख कार, पंधरा लाख दुचाकी, पंधरा हजार व्यावसायिक वाहने आणि तेरा हजार बस दररोज मुंबईच्या रस्त्यांवरून धावत असतात. मुंबई शहर आणि उपनगरात रस्त्यांच्या तुलनेत रस्त्यांवर उतरणाऱ्या वाहनांची संख्या किती तरी पटींनी अधिक आहे. वाहनांच्या संख्येच्या तुलनेत पार्किंगच्या ठिकाणांची संख्या तर किती तरी पटींनी कमी आहे. दरवर्षी मुंबईत साठ हजार नव्या कारची भर पडत असते. शिवाय या संख्येत उत्तरोत्तर वाढच होत असते. विशेष म्हणजे एका नव्या कारला रोज तीन पार्किंग ठिकाणांची आवश्यकता भासते आणि या तीन पार्किंग ठिकाणांमध्ये निवासस्थान, कार्यालयीन स्थान व एक उर्वरित स्थान यांचा समावेश होतो.बेस्ट प्रशासनाने यावर नामी युक्ती शोधून काढली असून; त्यानुसार मुंबई शहरासह उपनगरातील डेपो आणि टर्मिनसमधील जागा खासगी वाहनांच्या पार्किंगसाठी दिली जाणार आहे. तसा प्रस्तावच बेस्ट प्रशासनाने तयार केला आहे. दिवसाचे बारा तास वाहनचालकांना संबंधित ठिकाणी वाहने उभी करता येणार आहेत. यासंबंधीचे प्रस्तावित दरदेखील प्रशासनानाने ठरविले. बेस्ट प्रशासनाने प्रथमत: वरळी येथे हा पथदर्शी प्रकल्प राबविला होता. पथदर्शी प्रकल्पात यश आल्याने प्रशासनाने हा प्रकल्प आता शहर स्तरावर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)