Join us  

स्थानकांबाहेरील पार्किंगचे दर महागणार

By admin | Published: October 20, 2015 2:18 AM

उपनगरीय रेल्वे स्थानकांबाहेर असणाऱ्या वाहन पार्किंगसाठी प्रवाशांना जादा दर मोजावे लागणार आहेत. पार्किंगच्या दरात वाढ करण्याची तयारी मध्य रेल्वेबरोबरच पश्चिम रेल्वेनेही चालवली आहे.

मुंबई : उपनगरीय रेल्वे स्थानकांबाहेर असणाऱ्या वाहन पार्किंगसाठी प्रवाशांना जादा दर मोजावे लागणार आहेत. पार्किंगच्या दरात वाढ करण्याची तयारी मध्य रेल्वेबरोबरच पश्चिम रेल्वेनेही चालवली आहे. रोजच्या दरात साधारण २0 ते ३0 रुपये वाढवितानाच पश्चिम रेल्वेने सायकल आणि दुचाकी पार्किंगच्या वेळेतही कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून नव्याने निविदा काढण्यात येणार असून त्यामध्ये नवीन दर लागू होतील. बहुतांश लोकल प्रवासी हे स्थानकांपर्यंत येताना बाइक, कार, सायकल घेऊन येतात आणि वाहने स्थानकांबाहेर रेल्वेच्या हद्दीत पार्क करतात. वाहने पार्क करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून कंत्राटी पद्धतीवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वेचे पार्किंगचे दर हे कमी असल्याने अनेकजण या पार्किंगचा जास्तीतजास्त लाभ घेतात. सध्या मध्य रेल्वेवर ३७ स्थानकांबाहेर तर पश्चिम रेल्वेवर ४७ स्थानकांबाहेर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंगचे दर हे फारच कमी असल्याने आता नव्याने कंत्राट काढून त्यात नवे दर लागू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. मध्य रेल्वे मार्गावर मोटार कारसाठी चार आणि सहा तासांसाठी २0 ते ३0 रुपये तर बाइकसाठी १0 ते १५ रुपये मोजावे लागतात. यात नव्या कंत्राटात वाढ होणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. कारसाठी २0 ते ३0 रुपये आणि बाइकसाठी पाच ते दहा रुपये जादा मोजावे लागतील. पश्चिम रेल्वेवर स्थानकांच्या श्रेणीपद्धतीने दर लागू केले जातात. ‘ए’ श्रेणीच्या स्थानकांमध्ये बारा तासांसाठी सायकलला पाच रुपये, बाइकसाठी दहा रुपये तर कारसाठी ३0 रुपये मोजावे लागतात. नव्या कंत्राटानुसार मोटार कारसाठी २0 रुपये जादा मोजावे लागतील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. त्याचबरोबर सायकल आणि बाइकच्या पार्किंगच्या वेळेत कपात करत बाराऐवजी सहा तासांची पार्किंग केली जाणार आहे. पश्चिम रेल्वेच्या ‘बी’ श्रेणी स्थानकांच्या पार्किंगच्या दरातही वाढ होणार आहे.