मुंबईत पार्किंग महागले
By admin | Published: February 11, 2017 03:03 AM2017-02-11T03:03:22+5:302017-02-11T03:03:22+5:30
राज्य सरकारच्या दरबारात लटकलेल्या पार्किंगच्या धोरणाला अखेर हिरवा कंदिल मिळाला आहे़ या धोरणावरील स्थगिती उठवण्यात आल्यामुळे यापुढे रस्ते
मुंबई : राज्य सरकारच्या दरबारात लटकलेल्या पार्किंगच्या धोरणाला अखेर हिरवा कंदिल मिळाला आहे़ या धोरणावरील स्थगिती उठवण्यात आल्यामुळे यापुढे रस्ते आणि पदपथांवरील मोफत पार्किंग बंद होणार आहे़ मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतरच यावर अंमल होणार आहे़ म्हणजेच मार्चपासून मुंबईकरांना पार्किंगसाठी तिप्पट पैसे मोजावे लागणार आहेत़ त्याचबरोबर रात्रीचे पार्किंग, सोसायट्यांबाहेर दुतर्फा पार्किंग, सार्वजनिक परिवहनाला प्रोत्साहन या योजनाही लागू होणार आहेत़
पार्किंगचे जुने दर नोव्हेंबर २०१३ मध्ये संपुष्टात आल्यामुळे सुधारित दरांबरोबरच पार्किंगसाठी नवीन धोरण पालिकेने आणले़ मात्र एका तासाला १५ ते २० रुपये असलेले पार्किंगचे दर थेट २०, ४० व ६० रुपयांपर्यंत वाढविण्याची शिफारस प्रशासनाने केली़ यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतल्यामुळे सुधार समितीच्या मंजुरीनंतरही लोकसभा व विधानसभा निवडणूक पार पडेपर्यंत हे धोरण वर्षभर लटकले़ मात्र नवीन वर्ष उजाडताच पालिकेच्या महासभेत आज तडकाफडकी हे धोरण मंजूर करण्यात आले़ लोकांच्या विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या धोरणाला स्थगिती दिली होती़ निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याच्या एक आठवड्याआधी या धोरणावरील स्थगिती उठविण्यात आली आहे़ परंतु निवडणुकीनंतर ९२ रस्त्यावरील पार्किंग व १२ रस्त्यालगतच्या पार्किंगसाठी निविदा मागविण्यात येणार आहेत़
पार्किंगचे नवीन दर (गजबजलेली व वर्दळीची ठिकाणं-व्यापारी संकुल, कार्यालयं)
श्रेणी ए - फोर्ट, हुतात्मा चौक, हॉर्निमोन सर्कल, बॉम्बे हॉस्पिटल लेन, चर्चगेट, जहाँगीर आर्ट गॅलरी, नरिमन पॉर्इंट, ताजमहल हॉटेल, दादर टी़टी़, जी़बी़ मार्ग, गोरेगाव स्पोटर्स क्लब अशा ठिकाणी तीन चाकी व चार चाकी पार्किंगसाठी प्रत्येक तासाला १५ रुपयांवरुन आता ६० रुपये असणार आहे़ यामध्ये १ ते ३ पर्यंत ७५, ३ ते ६ पर्यंत १०५, ६ ते १२ पर्यंत १८० आणि रात्री १२ नंतर २१० रुपये दर आकारण्यात येतील़ तर दुचाकीसाठी हेच दर दुपारी १ वाजेपर्यंत १५, १ ते ३ पर्यंत ४५, ३ ते ६ पर्यंत ६०, ६ ते १२ पर्यंत ७५ आणि रात्री १२ नंतर ९० रुपये असणार आहेत़
श्रेणी बी - सामान्य व्यावसायिक ठिकाणं व कार्यालये
रिगेल सिनेम, पोलिस जिमखाना, नेपयन्सी रोड, फेमस स्टुडिओ लेन, बी़जी़ खेर मार्ग, न्यू प्रभादेवी रोड़ या ठिकाणी पार्किंगसाठी ४० रुपये़ यामध्ये तीन चाकी व चार चाकीसाठी १ ते ३ पर्यंत ५०, ३ ते ६ पर्यंत ७०, ६ ते १२ पर्यंत १२० आणि रात्री १२ नंतर १४० रुपये दर आकारण्यात येतील़ तर दुचाकीसाठी हेच दर दुपारी १ वाजेपर्यंत १०, १ ते ३ पर्यंत ३०, ३ ते ६ पर्यंत ४०, ६ ते १२ पर्यंत ५० आणि रात्री १२ नंतर ६० रुपये असणार आहेत़
पार्किंगची वाढती समस्या
मुंबईत आजच्या घडीला २० लाख वाहनं असून दरवर्षी यामध्ये ७ ते ८ टक्के वाढ होत आहे़ खाजगी वाहनांची संख्या सर्वाधिक आहे़ मात्र या तुलनेत मुंबई फक्त ९२ वाहनतळ आहेत़ यामध्ये एकावेळीस दहा हजार ३०४ वाहनं उभी राहू शकतात़ वाढत्या खाजगी वाहनांमुळे २०२१ मध्ये वाहनांचा आकडा ९० लाखांपर्यंत पोहोण्याची शक्यता व्यक्त होत आहे़
कमी वर्दळीची ठिकाणं
श्रेणी सी - बी़डी़ माझदा अपार्टमेंट, घाटकोपर, माहुल रोड शॉपर्स स्टॉपजवळ या ठिकाणी २० रुपये ताशी पार्किंगचे दर असणार आहे़ तीन व चारचाकी वाहनांसाठी १ ते ३ पर्यंत २५, ३ ते ६ पर्यंत ३५, ६ ते १२ पर्यंत ६० आणि रात्री १२ नंतर ७० रुपये दर आकारण्यात येतील़ तर दुचाकीसाठी १ वाजेपर्यंत पाच रुपये, १ ते ३ पर्यंत १५, ३ ते ६ पर्यंत २०, ६ ते १२ पर्यंत २५आणि रात्री १२ नंतर ३० रुपये असणार आहेत़
नवीन धोरण पुढील दोन वर्षांसाठी असणार आहे़ त्यानुसार गजबजलेल्या महत्वच्या ठिकाणी पार्किंगचे दर वाढणार आहेत़ वर्दळीची वेळ व वर्दळ नसलेल्या वेळेनुसार दरांमध्ये बदल असणार आहेत़
सुरुवातीला दोन वर्षांसाठी असलेल्या पार्किंगच्या दरामध्ये प्रत्येक दोन वर्षांनी दहा टक्क्यांची वाढ होणार आहे़ या दरवाढीचा फटका ९० टक्के खाजगी वाहन मालकांना बसणार आहे़
पूर्वी दुचाकी वाहनांच्या पार्किंगचे दर दोन रुपये तर चारचाकी वाहनांचे १५ रुपये होते़ यावेळी पहिल्यांदाच शहर व उपनगर अशी वर्गवारी करुन नवीन दर लागू करण्यात आले आहेत़
गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, गेटवे अशा पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पार्किंग मोफतच असणार आहे़ मात्र रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पार्किंगचे दर वेगळे असणार आहेत़
पार्किंगचे धोरण कशासाठी?
मुंबईतील दीड कोटी जनता बस व रेल्वेतून दररोज प्रवास करीत असते़ उर्वरित १५ ते २० टक्के खाजगी वाहनांतून प्रवास करतात़ अशा श्रीमंतांची वाहनं रस्त्याच्या कडल्याला उभ्या राहिल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो़ त्यामुळे रस्त्याची दोन्ही बाजू अडविणाऱ्या या श्रीमंतांकडून पार्किंग शुल्क वसूल करण्यासाठी पालिकेने हे धोरण आणले, असल्याचा दावा प्रशानाने केला आहे़ मात्र लालबाग, परळ, करी रोड, चिंचपोकळी येथील चाळी व जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला याचा फटका बसणार असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे़
राज्य सरकारच्या या धोरणात नवीन काय?
पर्यटनाला प्रोत्साहन : चौपाटी, गेटवे आॅफ इंडिया, म्युझियम, जुहू चौपाटी अशा पर्यटन स्थळी सुट्टीच्या दिवशी पार्किंग मोफत असणार आहे़
सार्वजनिक परिवहनाला प्रोत्साहन : खाजगी वाहनांची संख्या कमी होण्यासाठी कार व ट्रक मालकाकडून जास्त शुल्क व रिक्षा, टॅक्सी अशा सार्वजनिक परिवहनाला सवलतीच्या दरांमध्ये पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार आहे़ उदा़ खाजगी वाहनासाठी ४० रुपये आकारल्यास सार्वजनिक वाहनाला केवळ १० ते २० रुपये मोजावे लागतील़ नाईट पार्किंग : निवासी इमारतींच्या प्रवेशद्वाराबाहेरील रस्त्यांवर गाड्या उभ्या केल्या जातात़ या वाहनांच्या पार्किंगसाठी रात्री ८ ते स़ ८ अशी वेळ निश्चित केली जाणार आहे़ यासाठी मासिक पास देण्यात येईल़ ज्याचे नुतनीकरण दरवर्षी होईल़ या पार्किंगची किंमत नियमित मासिक पासाच्या एकतृतीयंश असणार आहे़ त्यानुसार दरमहा १३०० ते चार हजार रुपये आकारण्यात येणार आहेत़
बहुमजली पार्किंग लॉटच्या शंभर मीटर परिसरात गाडी उभी करण्यासाठी चारपट रक्कम मोजावी लागणार आहे़ तसेच बेकायदा पार्किंगसाठी ५० रुपये दंड आकारण्यात येणार असून यावर नजर ठेवण्यासाठी मार्शल्स नियुक्त केले जाणार आहेत़