महापालिका अधिकाऱ्यांचे आश्वासन मुंबई: गोरेगाव पूर्व मोहन गोखले रोड येथील ना विकास क्षेत्रातील भुखंडावर सुरू असलेल्या अनधिकृत वाहनतळ व अनधिकृत व्यवहारा विरोधात नागरिकांनी प्रभाग क्रमांक 52च्या भाजपा नगरसेविका प्रिती सातम यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी अनधिकृत वाहनतळा विरोधात स्थानिक नागरिकांनी पी दक्षिण महापालिका कार्यालयावर धडक देऊन ठिय्या आंदोलन केले.नागरिकांच्या या संतप्त भावनेची दखल घेऊन आज भाजपा जिल्हा अध्यक्ष संतोष मेढेकर व नगरसेविका प्रिती सातम यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी गोरेगाव प्रभाग क्रमांक 52 मधील नागरिकांच्या समवेत आज सकाळी नऊ वाजता महापालिकेच्या पी दक्षिण कार्यालयात धडक देऊन ठिय्या आंदोलन केले. यावेळी शेकडो नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या नाकर्ते पणा व अनधिकृत वाहनतळला संरक्षण देण्याचा कॄती विरोधात संताप व्यक्त करून महापालिका प्रशासना विरोधात जवळपास एक तास घोषणाबाजी केली. या संदर्भात आज लोकमतने वृत्त दिले होते.
मौजे पहाडी गोरेगाव सिटीएएस नंबर 596 मोहन गोखले रोड धीरज वॅली टॉवर्स समोर ना विकास क्षेत्रातील राखीव भूखंडावर गेल्या अनेक महिन्यापासून टाळेबंदी चा फायदा उठवून मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत वाहनतळ उभा करण्यात आला असून यासाठी महापालिकेने कोणतीही परवानगी दिलेली नाही. त्याचप्रमाणे या जागेवरती अनधिकृतपणे गॅरेज, भराव व झाडांची कत्तल या वाहनतळासाठी करण्यात आलेली आहे महापालिकेकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा हा वाहनतळ आजही सुरू आहे. यासंदर्भात गोरेगाव पोलीस ठाण्यांमध्ये संबंधितां विरोधात गुन्हा दाखल होऊन सुद्धा आजही हा अनधिकृत वाहनतळ सुरू असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हॅनिटी व्हॅन व अन्य गाड्यांचे पार्किंग होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असून त्यांच्या तक्रारीवरून यासंदर्भात स्थानिक नगरसेविका प्रीती सातम यांनी अनेक महिने महापालिका प्रशासनाशी पाठपुरावा करून सुद्धा समाधानकारक कारवाई होत नाही. या अनधिकृत वाहनतळामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असुन त्यांच्या मधे असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.
पोलिस अधिका-यांच्या मध्यस्थीने पालिका अधिकारी व आंदोलकांच्या प्रतिनिधी समवेत बैठक झाली यामध्ये नगरसेविका प्रिती सातम भाजपा उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष संतोष मेढेकर, जोगेश्वरी विधान सभा अनंत परब,उत्तर पश्चिम जिल्हा युवा मोर्चा श्री.सचिन भिल्लारे व वार्ड क्र.५२ चे अध्यक्ष मनोज पाल व नागरिक प्रतिनिधी पदाधिकारी प्रशासनाच्या वतीने विशेष अधिकारी सोनावणे, व इतर अधिकारी तसेच पोलिस अधिकारी दीपक फटांगरे सहाय्यक पोलीस आयुक्त हरीश गोस्वामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मध्ये बैठक होऊन 15 दिवसाच्या आत सदर अनधिकृत वाहनतळ कायमस्वरूपी हटवला जाईल असे आश्वासन देण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष संतोष मेढेकर यांनी महापालिका प्रशासनाला इशारा देताना तातडीने कारवाईची मागणी केली अन्यथा अधिक मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे राहील असे सांगितले. नगरसेविका प्रिती सातम यांनी 15 दिवसात कारवाई नाही झाली तर याहीपेक्षा उग्र आंदोलन उभे केले जाईल असा इशारा दिला आला, बेकायदा गोष्टींना व अनधिकृत वाहनतळ व अन्य गोष्टीना महापालिका अधिकारी देत असलेले अभय हे अंत्यत दुर्दैवी असुन कायदा, नियम व तरतुदींचे पालन करण्याची जबाबदारी असलेले लोकसेवक अशा पद्धतीने वागणार असतील तर त्यांना कर्तव्याची जाणीव करून देणे ही करदात्या नागरिकांची जबाबदारी आहे म्हणून आज सामान्य नागरिक आज मोठ्या प्रमाणात इथे आला आहे. प्रशासन जागे होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली अन्यथा पुढील आंदोलन यापेक्षा मोठे आणि अधिकारी वर्गाला जाग आणणारे असेल अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली.