मुंबईत वाहन उभे करणेही झाले महाग;अव्वाच्या सव्वा पार्किंग,दर पाहून फिरतील डोळे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 12:30 AM2020-11-09T00:30:16+5:302020-11-09T00:30:53+5:30
मुळात मुंबई महापालिकेचे पार्किंग दर पूर्वीपासूनच वादातीत राहिले आहेत.
मुंबई : कोरोनाला हरविण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आता शिथिल होत आहे. आणि हे लॉकडाऊन शिथिल होत असतानाच मुंबईकरांना मुंबई महापालिकेने लागू केलेले पार्किंगचे दर शॉक देत आहेत. कारण चर्चगेट येथील काही रहिवाशांकडून मुंबई महापालिकेच्या कंत्राटदाराने घराबाहेर रस्त्यांवर गाडी उभी करण्यासाठी अव्वाच्या सव्वा दराची मागणी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे हे दर तुमच्या गाडीनुसार ठरत असून, पार्किंगचे एवढे मोठे दर बघून नागरिकांचे डोळेच फिरले आहेत. दरम्यान, अशा प्रकाराची पार्किंग पॉलिसी लागू करण्याऐवजी नागरिकांना दिलासा मिळेल, अशी पॉलिसी लागू करत वाहनांच्या पार्किंगसाठी योग्य दर आकारले जावेत, असे म्हटले आहे.
चर्चगेट येथील एका घटनेनुसार, मुंबई महापालिकेच्या कंत्राटदाराने येथील नागरिकांकडून घराबाहेरील रस्त्यांवर गाडी उभी करण्यासाठी महिन्याला ५ हजार ५०० रुपयांची मागणी केली आहे. मुळात मुंबई महापालिकेचे पार्किंग दर पूर्वीपासूनच वादातीत राहिले आहेत. आणि आता तुमच्या वाहनानुसार तुम्हाला पार्किंगचे दर आकारले जात आहेत. यासाठी महापालिकेने विभागणी केली आहे.
व्यावसायिक (कमर्शियल), निमव्यावसायिक (सेमी-कमर्शियल), निवासी (रेसिडेंशियल) अशी विभागणी करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण मुंबईत अशा प्रकाराच्या पार्किंगचा विचार सुरू आहे. २४ विभागीय आयुक्तांना तसे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांनी दक्षिण मुंबईत काही ठिकाणी अव्वाच्या सव्वा पार्किंग दर आकारण्यास सुरुवात केली आहे. मात्र विभागणी करताना कमर्शियल आणि सेमी कमर्शियलमध्ये गोंधळ घालण्यात आला असून, त्यामुळे नागरिकांच्या गोंधळात आणखी भर पडली आहे. दरम्यान, गेल्या आठ महिन्यांत कोरोना आणि लॉकडाऊनमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यात आता पार्किंग दराने यात भर घातली आहे.