Join us

ठाणे स्थानकात दोन हजार वाहनांसाठी पार्किंग प्लाझा

By admin | Published: June 27, 2015 11:08 PM

रेल्वे मंत्रालयाने ठाणे स्थानक परिसरात दोन हजार वाहने सामावू शकतील, इतक्या विस्तीर्ण बहुमजली वाहनतळास (पार्किंग प्लाझा) मंजुरी दिली आहे.

ठाणे/डोंबिवली : रेल्वे मंत्रालयाने ठाणे स्थानक परिसरात दोन हजार वाहने सामावू शकतील, इतक्या विस्तीर्ण बहुमजली वाहनतळास (पार्किंग प्लाझा) मंजुरी दिली आहे. सुमारे १५०० स्क्वेअर मीटर क्षेत्रात हे वाहनतळ उभारण्यात येणार असून त्याच्या कामाचा शुभारंभ येत्या २९ जून रोजी रेल्वमंत्री सुरेश प्रभू हे रिमोट कंट्रोलद्वारे करणार असल्याचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी सांगितले. स्थानकातील पश्चिमेला बी केबिन परिसरात ही वास्तू उभारण्यात येणार आहे. देशातील पहिले रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज सात लाख प्रवासी ये- जा करतात. यातील बहुसंख्य प्रवासी ठाण्यात राहत असून नोकरी व व्यवसायानिमित्त मध्य रेल्वेने प्रवास करतात. घरापासून स्थानकापर्यंत बहुसंख्य प्रवासी स्वत:च्या वाहनाने येऊन परिसरात ती पार्क करतात. परंतु, सुसज्ज वाहनतळांचा अभाव असल्याने तेथे वाहने रस्त्यांसह इतरत्र पार्किंग केले जातात. अनेकदा प्लॅटफॉर्म नं. १ जवळील असलेल्या पार्किंग मध्ये असलेल्या तोकड्या जागेत गाड्या लावण्यात येत असल्याने गर्दीच्यावेळी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याची दखल घेऊन विचारे यांनी आमदार असताना ठाणे महापालिका आयुक्त व म.रे.चे तत्कालीन विभागीय व्यवस्थापक प्रबंधक मुकेश निगम यांच्याशी पत्रव्यवहार करून महापालिकेच्या माध्यमातून ही सुविधा मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता. (प्रतिनिधी)