वाहनतळ प्राधिकरणासाठी आवश्यक कार्यवाही सुरू हाेणार; स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईमध्ये वाहनतळाची समस्या बिकट होत आहे. या समस्येचे निराकरण करण्याकरिता सार्वजनिक ठिकाणी सोयीचे, सुरक्षित व परवडण्यासारखे वाहनतळ योग्य प्रकारे व विनिमयांसह उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. परिणामी वाहनतळ प्राधिकरणाची निर्मिती करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार वाहनतळ प्राधिकरण निर्मितीच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्यास व त्यासाठी बाह्य सेवा पुरवठादार यांची व तज्ज्ञ मंडळींची नेमणूक करण्यासाठी स्थायी समिती बैठकीदरम्यान मंजुरी देण्यात आली आहे.
नियोजित मुंबई वाहन प्राधिकरणचे गठण करण्याच्या दृष्टीने नेमण्यात आलेले तज्ज्ञ हे वाहनतळ प्राधिकरणाच्या स्थापनेसाठी असणाऱ्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करतील. मुंबई वाहनतळ प्राधिकरणाची संस्थात्मक निर्मिती करणे, २४ प्रशासकीय विभागांमधील वाहनतळ व्यवस्थापनविषयक सर्वसमावेशक आराखडा तयार करणे, वाहनतळ दरनिश्चितीबाबत धोरण व अभ्यास, वाहतूक चिन्हे व फलक यांसंबंधीची कार्यवाही, वाहनतळाच्या अनुषंगाने विविधस्तरीय संवाद साधणे व वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे, वाहन व्यवस्थापनासाठी माहिती तंत्रज्ञान आधारित संगणकीय बाबींचा अवलंब करणे, आदी कामेही तज्ज्ञ करतील.
शहरातील शासकीय, व्यावसायिक व निवासी इमारतींमधील वाहनतळाच्या जागांचा सुयोग्य वापर करण्याच्या दृष्टीने वाहनतळविषयक माहितीचा साठा तयार करणे, वाहनविषयक बाबींची सुयोग्य अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने वाहनतळ मार्शल यांची नेमणूक करण्याविषयी अभ्यास, विकास आराखड्यातील वाहनतळ आरक्षणाबाबत कार्यवाही करणे; भंगार झालेल्या किंवा वापरात नसलेल्या वाहनांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे; भूमिगत वाहनतळ, उड्डाणपुलाखालील जागांचा वापर याबाबत अभ्यास करणे, याचाही तज्ज्ञांच्या कामांत समावेश आहे.
मार्गदर्शकाची नियुक्ती
निवृत्त सनदी अधिकारी रामनाथ झा यांची कार्यवाहीसाठी मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थान यांची बाह्य सेवा पुरवठादार म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्यामार्फत संबंधित विषयातील तज्ज्ञांची सेवा उपलब्ध करून घेण्यात येईल.
- पी. वेलरासू, नवनियुक्त वाहनतळ आयुक्त, मुंबई महापालिका
--------------------------------------------------------