वाहतूककोंडी फोडण्यासाठी पार्किंगवर नियंत्रण हवे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 01:56 AM2019-07-23T01:56:11+5:302019-07-23T01:56:32+5:30
मुंबईतील वाहतूककोंडी ठरलेली, मुंबईकरांचा जास्त वेळ यामध्ये वाया जातो. वाहतूककोंडीची कारणे कोणती, त्यावर काय उपाययोजना करायला हवी याबाबत वाहतूकतज्ज्ञ अशोक दातार यांच्याशी साधलेला संवाद.
मुंबईत वाहतूककोंडी होण्याची कारणे कोणती?
आपल्याकडे रस्त्यावरील वाहनांची संख्या खूप जास्त आहे. या वाहनांनी पूर्वी २० टक्के जागा व्यापलेली असायची, पण आता ८० टक्के जागा व्यापली आहे. जागेच्या तुलनेत वाहने खूप वाढली आहेत. दरवर्षी गाड्यांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण नाही. जे लोक बस किंवा ट्रेनमधून जायचे ते आता खासगी गाडीने जात आहेत. त्यामुळे बसमधून प्रवास कमी झाला आहे. जर कारने प्रवास केला तर बसच्या पाचपट जागा लागते. एकेक दोन दोन जण जरी कारमध्ये गेले तरी मोठा परिणाम होतो. खासगी गाड्यांना पार्किंगसाठी जास्त जागा जाते. एका गाडीला तीन पार्किंग जागा लागतात़ अनेक ठिकाणी रस्त्यावरच पार्किंग केली जाते, त्यामुळे वाहतूककोंडी निर्माण होते. तर रस्ते आणि मेट्रोसारख्या प्रकल्पाच्या कामामुळे वाहतूककोंडी होते, परंतु ते ५ ते १० टक्के त्याचा परिणाम होतो.
वाहतूककोंडी सोडविण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात?
वाहतूककोंडी रोखायची असेल तर पार्किंगवर नियंत्रण असायला हवे. मोफत पार्किंग बंद करायला हवे, पार्किंगशिवाय गाडीचा परवाना द्यायलाच नको. पार्किंगवर नियंत्रण आणले तर गाडी घेण्याचे प्रमाण कमी होईल, त्यामुळे वाहतूककोंडी कमी होईल.
बेस्टने तिकीट दरात कपात केली, त्यामुळे वाहतूककोंडी सुटण्यास मदत झाली का?
बेस्टने दरकपात केल्यामुळे चांगला परिणाम झाला आहे. यापुढील काळात त्याचा दुप्पट ते तिप्पट परिणाम जाणवेल. त्यासाठी बसगाड्या वाढविणे गरजेचे आहे. पण बस वाढविल्या तर जागेची समस्या उभी राहील. त्यामुळे लेन करणे आवश्यक आहे, त्यामुळे बस ट्रेनसारख्या धावतील. बस लेनमुळे एका मिनिटाला एक बस जाईल. प्रवास सुकर होईल.