Join us

पार्ले महोत्सव सांस्कृतिक कार्याची मोठी चळवळ - आशिष शेलार

By मनोहर कुंभेजकर | Updated: December 30, 2024 14:15 IST

मुंबई-पार्ले महोत्सव ही सांस्कृतिक कार्याची मोठी चळवळ झाली आहे, सुरुवातीला पार्ले, नंतर उपनगर, मुंबई, आणि आता राज्यात पसरली आहे.

मुंबई-पार्ले महोत्सव ही सांस्कृतिक कार्याची मोठी चळवळ झाली आहे, सुरुवातीला पार्ले, नंतर उपनगर, मुंबई, आणि आता राज्यात पसरली आहे. येथील आमदार अँड.पराग अळवणी यांच्या नेतृत्वाखालील २४ वा पार्ले महोत्सव एकाच छत्राखाली सांस्कृतिक, क्रिडा, कला क्षेत्रातील खेळ आणि स्पर्धा एकत्र करून त्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणारे देशातील एक यशस्वी मॉडेल असल्याचे प्रशंसोद्गार महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री अँड.आशिष शेलार यांनी काल रात्री पार्ले महोत्सवात काढले. 

दहीहंडीला खेळाचा दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी आपण होतो, पण दहीहंडी केवळ सणाच्या वेळी होताना दिसते परंतू साहसी खेळाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर पहिल्यांदाच पार्ले महोत्सवात क्रीडा प्रकार म्हणून त्याची स्पर्धा आयोजित केली, त्याबद्दलही मंत्री शेलार यांनी आयोजकांचे कौतुक केले. 

यंदाच्या पार्ले महोत्सवातील अंतिम टप्प्यात दहीहंडीचा थरार विशेष गाजला. यात मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आदी विविध जिल्ह्यातून मिळून ३४ संघ सहभागी झाले होते. त्यात २० पुरुष आणि १४ महिला संघ होते. त्यांच्या कौशल्याला उपस्थितांकडून टाळ्यांच्या कड़कडाटात साथ मिळत होती. 

गणेश आचार्य यांची उपस्थिती

पार्ले टिळक विद्यालय येथील नृत्य स्पर्धेसाठी सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी हजेरी लावली. त्यांच्या आगामी `पिंटू की पप्पी’ या कौटुंबिक चित्रपटाचे नायक सुशांत आणि नायिका विधि देखील यावेळी उपस्थित होते. महोत्सवाचे आयोजक आमदार पराग अळवणी यांनी त्यांच्या चित्रपटाला सुरूवातीलाच उपस्थितांकडून शुभेच्छा दिल्या. तसेच गणेश आचार्य यांनी सिनेसृष्टीला भरभरून दिले आहे आणि  असे मोठे कलाकार आल्यानंतर इथल्या स्पर्धकांना प्रोत्साहन मिळते, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

यावेळी बोलताना गणेश आचार्य यांनी परीक्षकदेखील इथल्या स्पर्धकांपासून काहीतरी शिकत असावेत, इतके उत्तम सादरीकरण असल्याचे सांगून स्पर्धकांचे कौतूक केले तसेच विशेष गटातील स्पर्धकांचे नृत्य पाहून आपण अचंबित झाल्याचेही ते म्हणाले. नवीन कलाकारांना संधी देण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असतो, आगामी चित्रपटासाठी आपण महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील किनवट गावचा सुशांत निवडला. आणि आज तुमच्या टॅलेन्टमधून मला उद्याचे कलाकार निवडायचे आहे, असेही ते म्हणाले. 

चित्रपटाचा नायक सुशांत यांनी मराठीतून उपस्थितांशी संवाद साधला तसेच नायिका विधि यांनीही शुभेच्छा दिल्या. पार्ले महोत्सवाचे पदाधिकारी चरणसिंग सिद्धू यांनी कार्यक्रमाचे अस्खलित मराठीतून सूत्रसंचालन केले.

टॅग्स :आशीष शेलार