कारगिलची ही चित्तथरारक स्पंदनं ऐकताना पार्लेकर झाले भावविभोर
By मनोहर कुंभेजकर | Published: July 30, 2023 05:00 PM2023-07-30T17:00:54+5:302023-07-30T17:01:34+5:30
साठे कॉलेजच्या एनसीसी १९८५ च्या बॅचमध्ये त्यांना प्रवेश मिळाल्याने लष्करात जाण्याचे बीज त्यांच्या मनात अंकुरल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबई - विलेपार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघाच्या सी म जोशी दिलासा केंद्री तर्फे "स्पंदने कारगिलची" हा कार्यक्रम कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने कारगिलच्या आठवणींना उजाळा दिला.कारगिलची ही चित्तथरारक स्पंदनं ऐकताना श्रोते भावविभोर झाले. मुसळधार पाऊस असूनही कार्यक्रमाला चांगली उपस्थिती होती.
विलेपार्ले (पूर्व),गोखले सभागृह, टिळक मंदिर, राम मंदिर मार्ग येथे प्रत्यक्ष कारगिल युद्धात सहभागी झालेले व कारगिल युद्धातील 'पीक५२२०' सर करणारे ब्रिगेडियर संग्राम दळवी एस एम निवृत्त यांची प्रकट मुलाखत घेतांना नीलम वराडकर यांनी घेतली. प्रथम 'संग्राम' या नावाचे आणि त्यांच्या कार्य भूमीचे अजोड नाते त्यांनी विशद केले. लष्कराची कुठलीही पार्श्वभूमी नसताना अतिशय प्रतिष्ठित असे कमेंडेशन कार्ड आणि 'सेना मेडल' पुरस्कारित या वीरपुत्राच्या माऊलीला वंदन करून कार्यक्रम सुरु झाला.
साठे कॉलेजच्या एनसीसी १९८५ च्या बॅचमध्ये त्यांना प्रवेश मिळाल्याने लष्करात जाण्याचे बीज त्यांच्या मनात अंकुरल्याचे त्यांनी नमूद केले. अतिशय दुर्गम भागात - ४२ डिग्री तापमानात १७२०० फूट उंचीवर, जिथे आठ-आठ महिने बाहेरील जगाशी संपर्क नसतो, सैनिक मनोधैर्याच्या बळावर देशाच्या सीमेचे रक्षण करण्यास तत्परतेने पहारा देत असतात. खराब हवामानात तर त्यांना रसदही पोहोचत नाही. बर्फाची वादळे अंगावर झेलत अनेकदा प्राण गमवावे लागतात. कारगिलच्या युद्धात बर्फाची भिंत नव्वद अंशाच्या कोनात समोर उभी राहिल्यावर, सैनिकांनी ती कशी पार केली हा चित्तथरारक प्रसंग ब्रिगेडियर संग्राम दळवी यांनी सांगितला.
१७२०० फूट उंचीवर,जिथे, माणसाला श्वास घेणे कठीण,तेथे 'पीक ५२२०' हे ब्रिगेडियरनी आपल्या नेतृत्वाखाली जिंकलं. एकही जवान न गमावता. या पराक्रमाबद्दल भारत सरकारने 'सेना मेडल' देऊन त्यांना गौरविलं. समाजात या पेशाविषयी अनास्था दिसते. मुंबईच्या तरुणात लष्कर प्रवेशाविषयी तितकीशी उत्सुकता दिसत नाही. राष्ट्रवर्धनासाठी मौलिक योगदान देऊन देशाच्या रक्षणासाठी स्वतःच्या कुटुंबापासून शेकडो मैल दूर असलेला सैनिक जेव्हा सुट्टीमध्ये स्वगृही परततो, तेव्हा प्रवासात त्याला प्रसाधनगृहाजवळ बसून प्रवास करावा लागतो हे हृदयविदारक सत्य आहे याबद्धल त्यांनी तीव्र खेद व्यक्त केला.
१९७१ नंतर १९९९ कारगिरला जाणारी टुरटुक मध्ये जाणारी ही पहिली बटालियन होती. १६ हजार फुट उंचावर असलेली पोस्ट. पलीकडच्या पोस्टवर संपर्क साधण्यासाठी केबल लावणे आवश्यक होतं. १२ कि.मी.रस्ता पार करण्यासाठी८/९ तास. असा अंदाज होता. रात्री २.३० वाजता सुरुवात केल्यावर पहिले ३.३० तास व्यवस्थित गेले, नंतर अचानक ३कि.मि.ग्लेशियर लागलं.२५फूट उंच पहिला बर्फाचा उभा कडा.तयारी असूनही, तो पार अतिशय कठीण होतं. अंगावर थंडीपासून रक्षणासाठी कपडे, पाठीवर मणांचे ओझे ,२५ फूटाची उंच आईस वॉल क्रॉस करणं मोठं दिव्य होतं.त्याला २.३० तास लागले.एक जवान आजारी पडला.पाठीवर असलेल्या रसदीबरोबरच त्यालाही उचलून चाललो.
सूर्य उगवला .तीक्ष्ण सूर्यकिरणं, थंडीपासून वाचण्यासाठी घातलेल्या कपड्यांमुळे उष्णता वाढली. तहानेने जीव व्याकूळ झाला.पाणी संपलं.तीन किलोमीटर परिसरात कुठेही विश्रांती घेण्याची सोय नव्हती. पहाटे२.३० वाजता निघालेलो आम्ही रात्री ८ वाजता त्या पोस्टवर पोहोचलो.ही लढाई निसर्गाबरोबरची होती. हे मोठ्ठ आव्हान होतं.या कामगिरीबद्दल त्यांना कमेंडेशन कार्ड देऊन गौरविण्यात आलं.या किस्सा त्यांनी पार्लेकरांना त्यांनी सांगितला.
देशासाठी,एक पाय गमवावा लागला असतानाही, जयपूर फूट लावून पुन्हा युद्ध करण्यास सज्ज असणारा सैनिक. एका पुत्रांनी देशासाठी प्राण गमावल्यावरही, माझा दुसरा पुत्र देशाच्या रक्षणार्थ सज्ज आहे असे सांगणारी वीरमाता पाहिली की, भारतीयांच्या असामान्य धैर्याचे कौतुक वाटते.रणभूमीवर शारीरिक आरोग्यापेक्षा मानसिक आरोग्य महत्त्वाचे असल्यामुळे लष्कराच्या प्रवेश परीक्षेमध्ये मानसिक आरोग्याचीही परीक्षा घेतली जाते.असे सांगून,एन सी.सी कॅडेटसना त्यांनी लष्कराच्या प्रवेशाबद्दल मार्गदर्शन केले.