Join us

परमार आत्महत्येचे महासभेवर पडसाद

By admin | Published: November 04, 2015 2:48 AM

परमार आत्महत्येप्रकरणी चार नगरसेवकांची नावे पुढे आल्यानंतर आता या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांनी इतर नगरसेवकांचीही चौकशी सुरु केली आहे.

ठाणे : परमार आत्महत्येप्रकरणी चार नगरसेवकांची नावे पुढे आल्यानंतर आता या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांनी इतर नगरसेवकांचीही चौकशी सुरु केली आहे. पोलिसांच्या या चौकशीविषयी अनेक नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर परमार यांच्या सुसाईड नोटमध्ये नाव असलेल्या चार नगरसेवकांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर उद्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या प्रकरणावर सर्वपक्षीय नगरसेवक काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. कारण त्या चौघांना न्यायालयाने महासभेत जाण्यास मनाई केली आहे. त्यातच पुन्हा साध्या वेषातील पोलीस महासभेला पुन्हा हजेरी लावणार का? ती लावली तर महापौर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी अनेक राजकीय पक्षाच्या नगरसेवकांकडे केलेल्या चौकशीत सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्या नगरसेवकांनी कितपत त्यांना त्रास दिला, याची विचारणा केली होती. त्यावेळी अनेकांनी शहरातील विवादास्पद विषयावर सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवक आपली मते वारंवार व्यक्त करीत असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर या प्रकरणात थेट संबध नसताना घरी नोटीस पाठवून बोलाविल्याबद्दल नगरसेवकांनी पोलिसांकडेच नाराजी व्यक्त केली. त्याऐवजी थेट दूरध्वनीवरु न बोलाविले असते तरी माहिती देण्यासाठी आपण उपलब्ध झालो असतो, अशी भूमिकाही काहींनी मांडली होती. अशावेळी विवादास्पद प्रकल्पाबाबत महापालिका प्रशासनाला जाब विचारायचा की नाही, अशा मनिस्थतीत अभ्यासू नगरसेवक आले आहेत. भविष्यात शहरात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास आपण विचारलेले प्रश्न आपल्याला अडचणीत आणणारे ठरणार नाहीत ना, अशी कुजबुज नगरसेवकांनामध्ये सुरु आहे.दरम्यान विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, सुधाकर चव्हाण आणि विक्रांत चव्हाण यांना महापालिकेत प्रवेश बंदी असल्याने इतर नगरसेवक सर्वसाधारण सभेत त्यांच्या चौकशीबाबत काय भूमिका घेणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. या महासभेवर पुन्हा पोलीस लक्ष केंद्रीत करणार असून साध्या वेशात हजेरी लावणार असल्याने महासभेत आपले विचार मांडायचे अथवा नाहीत, याबाबत कमालीचा संभ्रम नगरसेवकांमध्ये निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)