पारनेरच्या मेजर बाबाच्या सासऱ्याला पोलिसांचे संरक्षण?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 04:02 AM2018-08-24T04:02:42+5:302018-08-24T04:03:29+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आरोप; १५ दिवस उलटूनही हाती लागेना
मुंबई : कान्हुर पठार येथे ३० वर्षांपासून भोंदूगिरीचा व्यवसाय थाटलेल्या मेजर बाबासह त्याचा सासरा माधव सोनावळेचा लोकमतने नुकताच स्टिंग आॅपरेशनद्वारे पर्दाफाश केला. मेजर बाबाला अटक होताच, सासरा सोनावळेने पोलिसांसमोर अंथरुण धरले. पुढे न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने तो गावातच अंडरग्राउंड झाला आहे. पोलिसांनी वेळीच अटक केली असती तर तोही कोठडीत असता, मात्र कुठे तरी पोलिसांचेच त्याला संरक्षण असल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य तसेच तक्रारदाराकडून होत आहे.
पारनेरच्या कान्हुर पठार या खेडेगावात मेजर बाबा बबन ठुबे आणि सासरा माधव सोनावळे या दोघांनी भोंदूगिरीचा व्यवसाय थाटला. मेजर बाबा स्मशानातील कोळसा आणि फक्त औषधांनीच गर्भलिंग, लिंगबदल तसेच मूल होण्याचा दावा करायचा. यामध्ये जादूटोण्याच्या विधी आणि औषधांसाठी साडेआठ हजार रुपये बाबा उकळत असे. दिवसाला १० ते १२ ग्राहक तरी ठरलेले असायचे. लोकमतच्या स्टिंगनंतर ११ आॅगस्टच्या पहाटे मेजर बाबाला जादूटोणा तसेच फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झाली. त्यापाठोपाठ पत्नी बेबी ठुबेलाही अटक करण्यात आली. दोघेही पोलीस कोठडीत आहेत.
दुसरीकडे ७८ वर्षांचा माधव सोनावळे अटकेच्या दुसºयाच दिवशी अंथरुणाला खिळला. स्टिंगमध्ये वयाच्या ७८ व्या वर्षीही कुठलाही आजार नसून ठणठणीत असल्याचा दावा करणारा सोनावळे पोलिसांसमोर विविध आजार, शस्त्रक्रियांचे ढोंग रचताना दिसला.
मूल होत नाही, पती पळून गेला, जागेचा वाद, बेरोजगारी, लग्न जुळत नाही यासाठी तो जादूटोणा करून मार्ग दाखवत असे. त्याच्या एका विधीमागे तो २५ हजारांपासून लाखो रुपये उकळत होता.
पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात तोही आरोपी असताना, त्याच्या कारवाईसाठी दिरंगाई केलेली दिसून आली. घरातील सामान ठिकाणावर लावण्यासाठी त्याला वेळ मिळाला. १२ आॅगस्ट रोजी पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी त्यांच्या घराची झडती घेतली. मात्र त्यात काहीच आढळून आले नसल्याचे सांगितले. त्यानंतर सोनावळेने अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू केली. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला. पुढे सोनावळे गावातच अंडरग्राउंड झाला आहे. यासाठी त्याला पोलीसच मदत करत असल्याचा संशय तक्रारदार अश्विन भागवत याने लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
मोबाईल लोकेशनवरून शोध
१५ दिवस उलटत आले तरी सोनावळे फरार आहे. पुरवणी जबाबात सोनावळेच्या कुटुंबीयांच्या नावांचाही उल्लेख करण्यात आला. त्यामुळे सोनावळे कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्या आहेत. सोनावळेच्या मोबाइल लोकेशनवरून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पारनेर पोलिसांनी दिली.