Join us

Andheri Bridge Collapse : अंधेरी रेल्वे स्टेशनजवळ पादचारी पुलाचा भाग कोसळल्यानं वाहतूक ठप्प, 5 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2018 8:04 AM

पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्टेशनजवळ पादचारी पुलाचा काही भाग कोसळला आहे. रेल्वे ट्रॅकवरच पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्यानं पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

मुंबई - पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्टेशनजवळ पादचारी पुलाचा काही भाग कोसळला आहे. रेल्वे रुळांवरच पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्यानं पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अंधेरी-विलेपार्लेदरम्यान असलेल्या पादचारी पुलाचा भाग कोसळला आहे. यामुळे चर्चगेटहून विरारकडे जाणारी व विरारहून चर्चगेटच्या दिशेनं येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 8 आणि 9 वरील ही घटना आहे.  मंगळवारी (3 जुलै) सकाळी 7.35 वाजण्याच्या सुमारास अंधेरी-विलेपार्लेदरम्यान असलेल्या गोखले पुलाचा काही भाग कोसळला आहे. या घटनेत 5 जण जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.  ऐन गर्दी आणि कार्यालय गाठण्याच्या वेळेस झालेल्या या खोळंब्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

दरम्यान,  अग्निशमन दल आणि पश्चिम रेल्वेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून कोसळलेल्या पुलाचा ढिगारा बाजूला काढण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या घटनेमुळे पूल कोसळल्यानं हार्बर मार्गावरील वाहतूकही थांबवण्यात आली आहे. अंधेरी स्टेशनच्या दक्षिण दिशेला असलेला हा पूल पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारा आहे. पुलाचा भाग कोसळल्यामुळे ओव्हर हेड वायरमधील वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यासाठी सुमारे 5 ते 6 तास लागतील, असे म्हटले जात आहे.

मेल एक्स्प्रेसलाही फटकाया घटनेमुळे  दादर, चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल येथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या मेल एक्स्प्रेसलादेखील फटका बसला आहे. बहुतांशी मेल एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे.

 

 

 

टॅग्स :अंधेरी पूल दुर्घटनापश्चिम रेल्वेलोकलअंधेरीअपघात