Join us

चांदिवलीत इमारतीचा काही भाग कोसळला; एकाचा मृत्यू, चार जण अडकल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2017 9:51 PM

चांदिवलीतील संघर्ष नगर बसस्टॉप परिसरातील कृष्णा बिझनेस पार्क इमारतीचे पाडकाम सुरू असताना इमारतीचा भाग कोसळल्याची माहिती मिळते आहे

ठळक मुद्देचांदिवलीतील संघर्ष नगर बसस्टॉप परिसरातील कृष्णा बिझनेस पार्क इमारतीचे पाडकाम सुरू असताना इमारतीचा भाग कोसळल्याची माहिती मिळते आहेयामध्ये एकाचा मृत्यू झाला असून ४ ते ५ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई, दि. 26-  चांदिवलीतील संघर्ष नगर बसस्टॉप परिसरातील कृष्णा बिझनेस पार्क इमारतीचे पाडकाम सुरू असताना इमारतीचा भाग कोसळल्याची माहिती मिळते आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून ४ ते ५ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन जणांना फायर ब्रिगेडच्या जवानांनी वाचवलं असून त्यांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण या तीघांपैकी एकाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. गौरव(वय 32) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर इतर दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत. बबलू (वय 25), पवन (वय 19) अशी जखमींची नावं असून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान, ढिगाऱ्याखाली आणखी जण अडकल्याची भीती वर्तविली जाते आहे. 

कृष्णा बिझनेस पार्क ही इमारत रिकामी करण्यात आली होती. इमारतीचे पाडकाम सुरू असताना इमारतीचा भाग कोसळला, अशी माहिती मुंबई फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्याने दिली आहे. इमारतीचं पाडकाम सुरू असताना इमारतीचा मधला भाग पडला पण इतर भाग तसेच होते. त्यामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत असल्याची माहिती, फायर ब्रिगेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. तसंच इमारतीमध्ये जे चार जण अडकल्याची शक्यता आहे, त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्याचे आम्ही प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

कृष्णा बिझनेस पार्क या सहा मजली इमारतीचा मधला भाग पाडकाम सुरू असताना कोसळला. इमारतीचा मधलाच भाग कोसळल्याने आजूबाजूचा भाग मात्र लटकता राहिलेला आहे. इमारतीचा काही भाग कोसळल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाचे ८ बंब, १ बचाव पथक आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाले.