विक्रोळीत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा काही भाग कोसळला; दोघांचा मृत्यू
By जयंत होवाळ | Published: June 10, 2024 09:14 PM2024-06-10T21:14:15+5:302024-06-10T21:14:22+5:30
शहरात २४, पूर्व उपनगरात ६, तर पश्चिम उपनगरात ६ ठिकाणी अशा मिळून ३६ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.
मुंबई : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा काही भाग कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. विक्रोळी पश्चिमेकडे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील लोखंडी सळ्या आणि सज्जाचा भाग कोसळून दोघांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. नागेश रेड्डी (३८ वर्षे) आणि रोहित रेड्डी (१० वर्षे) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. विक्रोळी पश्चिमेकडील टाटा पॉवर, कैलास बिझनेस पार्कजवळ पाच मजल्यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू होते. बांधकामाचा काही भाग कोसळून दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
३६ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना
या दुर्घटनेव्यतिरिक्त पावसामुळे शॉर्टसर्किट आणि झाडे पडण्याच्या घटनाही घडल्या. शहरात २४, पूर्व उपनगरात ६, तर पश्चिम उपनगरात ६ ठिकाणी अशा मिळून ३६ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. ५७ ठिकाणी झाडे पडल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. शहरात १७, पूर्व उपनगरात ७ आणि पश्चिम उपनगरात मिळून ५७ ठिकाणी झाडे पडल्याच्या तक्रारी होत्या. पावसामुळे विक्रोळी टागोरनगर, साकीनाका, मुलुंड, भांडुप, विद्याविहार, दहिसर चेकनाका, अंधेरी, वांद्रे (प.), विलेपार्ले, मालाड या भागात पाणी साचल्याच्या तक्रारी होत्या.