मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात आपत्कालीन घटनांचे सत्र सुरूच आहे. सोमवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास कुर्ला पश्चिमेकडील राम मनोहर लोहिया मार्गावरील हायटेक परिसरात इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले, तर एकाचा मृत्यू झाला. मृतामध्ये पाच वर्षीय लहान मुलाचा समावेश असून, अफान खान असे त्याचे नाव आहे.
मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास कुर्ला पश्चिमेकडील विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याच्या परिसरात तळमजला अधिक म्हाडाच्या एकमजली बांधकाम असलेल्या घराच्या छज्जाचा भाग कोसळला. दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, मुंबई महापालिकेचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली. या दुर्घटनेत एकूण चार जण जखमी झाले. या जखमींपैकी तिघांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात जखमींपैकी पाच वर्षीय अफान खान याचा मृत्यू झाला. तर रफिक शेख आणि इरफान खान यांच्यावर उपचार सुरू आहेत. कुर्ला येथील भाभा रुग्णालयात सहा वर्षीय मोहम्मद जिकरान या चौथ्या जखमीवर उपचार सुरू आहेत.
नेमके काय झाले?दुर्घटनाग्रस्त इमारत म्हाडाच्या मालकीची आहे. शॉपिंग सेंटरच्या पहिल्या माळ्याच्या छज्जाचा भाग तळमजल्यावर असलेल्या उपाहारगृहावर कोसळला.