लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उच्च शिक्षण घेऊनही अनेक जण नोकरीअभावी बेरोजगार आहेत. यातच, पार्टटाइम जॉबच्या नादात जमापुंजी गमवावी लागते. त्यामुळे ऑनलाइन नोकरी शोधताना खातरजमा करणे गरजेचे असल्याचे सायबर पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
व्हिडीओ लाइक करण्याचा टास्क
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांना व्हॉट्सॲपवर ग्लोबल अडवर्ट कॉप.ऑफिशियल या कंपनीच्या नावे पार्टटाइम जॉबसाठी संदेश पाठवून त्यांना कंपनीच्या टेलिग्राम ग्रुप जॉइन होण्यास सांगितले. टेलिग्राम ग्रुपवर त्यांना यूट्युब लिंक ओपन करून व्हिडीओ लाइक करण्याचा जॉब टास्क देण्यात आला. जॉब टास्क केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात सुरुवातीला १५० रुपये जमा झाले. पुढे १,३०० रुपये आले. टास्क पूर्ण केल्यावर त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होत असल्याने त्यांचा विश्वास बसला. पुढे, सावज जाळ्यात येताच, तक्रारदारांना मोठा टास्क देऊन त्यांना १२ ते ५० हजार रुपये भरण्यास सांगून जास्त जास्त पैसे कमविण्याचे आमिष देण्यात आले. यामध्ये तक्रारदारांची सव्वाचार लाखांना फसवणूक झाली. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला. अशाच प्रकारे दिवसाआड फसवणुकीच्या घटना डोके वर काढत आहेत.
सावधान..!
ऑनलाइन नोकरी, यूट्युब लिंक लाइक करून पैसे कमविणे, विविध वेबसाइटवर ऑनलाइन वस्तू विकून कमिशन मिळविणे, अशा प्रकारचे आमिष दाखवत सायबर भामट्यांकडून दाखविण्यात येते. अशा आमिषाला लोकांनी बळी पडू नये, असे आवाहन चुनाभट्टी पोलिसांकडून करण्यात येत आहे.
चार महिन्यांत ११६ गुन्हे
गेल्या चार महिन्यांत सायबर गुन्ह्यांचे १,५६५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये, नोकरीच्या नावाने फसवणूक केल्याप्रकरणी ११६ घटनांची नोंद पोलिस दफ्तरी झाली आहे. यापैकी सहा गुन्ह्यांची उकल करत २० जणांना अटक केली आहे.
अशी घ्या काळजी...
- सोशल मीडियावर ॲक्टीव्ह असताना गोपनीय सेटिंगचा वापर करा.- कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका.- ऑनलाइन बँक व्यवहार करताना काळजी घ्या.- आपला पासवर्ड किंवा ओटीपी कोणालाही देऊ नका.