Join us

भाग दोन : अंमलबजावणी अग्निसुरक्षेची - परवानगीपेक्षा अधिक सिलिंडर आढळल्यास महापालिकेद्वारे होणार जप्तीची व दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 4:34 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत सतत आगीच्या घटना घडत असतात, यातील बहुतांशी घटना या सिलिंडर स्फोटाशी निगडित असतात. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत सतत आगीच्या घटना घडत असतात, यातील बहुतांशी घटना या सिलिंडर स्फोटाशी निगडित असतात. लालबाग येथे झालेल्या सिलिंडर स्फोटातदेखील मोठी मनुष्यहानी झाली आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून मुंबई महापालिका सतत खबरदारी घेण्याचे आवाहन करीत असते. मात्र नागरिक निष्काळजीपणा करतात आणि घटना घडतात. परिणामी, अशा घटना घडू नयेत म्हणून पालिकेने पुन्हा एकदा एल.पी.जी. सिलिंडरच्या वापराबाबत सूचना केल्या आहेत.

सर्वच सिलिंडरचा साठा व वापर करताना अतिशय काळजी घेणे गरजेचे आहे. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे सिलिंडर हे अधिकृत गॅस वितरकाकडून व अधिकृतपणेच खरेदी करावेत. सिलिंडर घेतानाच त्यात लिकेज नसल्याची खातरजमा गॅस कंपनीच्या अधिकृत व्यक्तीकडून करवून घ्यावी. गॅस लिकेजची खातरजमा करून गॅस सिलिंडर देणे हे गॅस वितरण कंपनीच्या प्रतिनिधीलादेखील बंधनकारक आहे, याची आवर्जून नोंद घ्यावी. सिलिंडर घेताना लिकेज तपासणी करतेवेळी लिकेज असल्याचे लक्षात आल्यास लगेचच सिलिंडर बदलून घ्यावा.

सिलिंडरचा साठा करताना, वापरताना ते बंदिस्त जागी ठेवू नयेत. सिलिंडर आडवे ठेवल्यास लिकेज होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. सिलिंडर आडवे ठेवू नयेत. सिलिंडरचा साठा करताना त्याची सेफ्टी कॅप लावलेली असणे आवश्यक आहे. सिलिंडरजवळ ज्वालाग्राही पदार्थ ठेवू नयेत. गॅस सिलिंडर, रेग्युलेटर, पाइप, गॅस शेगडी यांची जोडणी करताना अधिकृत व्यक्तीकडूनच करावी. एखादी बाब खराब झालेला आढळल्यास ती दुरुस्त करण्याऐवजी नवीन घ्यावी व तंत्रज्ञाच्या सल्ल्यानुसार कार्यवाही करावी. तसेच गॅसचा पाइप हा २ मीटरपेक्षा अधिक लांबीचा नसेल याची काळजी घ्यावी.

---------------

जप्तीची व दंडात्मक कारवाई

एक सिलिंडर, दोन सिलिंडर किंवा दोनपेक्षा अधिक सिलिंडर यांचा एकाच वेळी वापर करायचा असल्यास किंवा साठा करायचा असल्यास तो दिलेल्या परवानगीनुसारच करणे बंधनकारक आहे. दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक सिलिंडर आढळल्यास त्यावर महापालिकेद्वारे जप्तीची व दंडात्मक कारवाई केली जाते.

---------------

गॅसगळती

गळती होत असल्यास शटऑफ व्हॉल्व / रेग्युलेटर बंद करावे. दरवाजे-खिडक्या उघडाव्यात. कोणतेही विद्युत उपकरण वा बटन बंद अथवा चालू करू नये. शक्य असल्यास सिलिंडर जमिनीवरील मोकळ्या जागेत नेऊन ठेवावा. गळती झाली असेल तेथून बाहेर पडून सुरक्षित जागी जावे. गळतीबद्दल गॅस कंपनीला व अग्निशमन दलास कळवावे.

---------------

गॅस लिकेज डिटेक्टर

गॅसगळती स्वयंचलित पद्धतीने शोधून त्याची सूचना देणारे अत्याधुनिक गॅस लिकेज डिटेक्टर तंत्रज्ञाच्या मार्गदर्शनानुसार बसवून घ्यावे. परवानगीनुसार गॅस सिलिंडरचा साठा असलेल्या ठिकाणी तसेच गॅस शेगडीच्या ठिकाणी सुयोग्य पद्धतीने गॅस लिकेज डिटेक्टर बसवावे.

---------------

एल.पी.जी.चे ३ प्रकार

- १४.२ किलो

- १९.२ किलो

- ४५ किलो