मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सव काळात घरोघरी भेटी देऊन अनेक कार्यकर्त्यांचे समाधान केले. तर, उद्योजक मुकेश अंबानी यांच्यापासून ते राज ठाकरेंपर्यंतच्या दिग्गजांच्याही घरी बाप्पांचे दर्शन घेतले. या गाठीभेटीवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टिका केली होती. त्या टिकेला मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळे, शिंदे विरुद्ध पवार असा सामना रंगला होता. मात्र, आता अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी बाप्पांच्या दर्शनाला पोहोचले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर असून त्यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर, अभिनेता नाना पाटेकर यांच्याही घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले. मात्र, इकडे वर्षा बंगल्यावर पार्थ पवार यांनी सायंकाळी अचानक भेट दिली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असलेल्या गणपती बाप्पांचे दर्शन पार्थ यांनी घेतले. यावेळी, खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच श्रीकांत शिंदे यांनी अजित पवारांवर टिका केली होती. त्यामुळे, या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच, या भेटीचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर होत आहे.
दरम्यान, पार्थ पवार यांनी २०१९ साली मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी त्यांचा दणदणीत पराभव केला होता. त्यानंतर, पार्थ पवार राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. परंतु, अधीमधी ते ट्विटद्वारे आपली भूमिका मांडत होते. आता, त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्काला उधाण आलं आहे.
श्रीकांत शिंदेंच अजित पवारांसाठी ट्विट
"दादा हा 'शो' नाही, पहाटेच्या फ्लॉप 'शो'सारखा… हा 'शो'ले आहे, एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा! आणि हो… हिंदुत्वाचे तेज आणि विकासकामांच्या 'ट्रेलर'नेच धडकी भरली?.... पिक्चर अभी बाकी है!!!" असं श्रीकांत शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच khatteangur हा हॅशटॅग देखील वापरला आहे.
अजित पवारांनी केली होती शिंदेंवर टीका
अजित पवार यांनी माध्यमांकडे सध्या कुठल्या बातम्या नाहीत. अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीसांनी भेटीबाबत नकार दिलाय. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने काम करत असतो. जनता निवडून देत असते. गणेशोत्सव वर्षानुवर्षे सुरू आहेत. यंदा गाठीभेटी वाढल्या आहेत. परंतु आम्हीही गणपतीच्या दर्शनासाठी जातो पण कॅमेरा घेऊन जात नाही. जो गणेशभक्त आहे, त्याने अशाप्रकारे देखावा दाखवण्याचं कारण नाही. पूर्वीच्या काळात शोमॅन होते, राज कपूर शोमॅन म्हणून ओळखले जायचे तसं हल्ली काहींना शो करायची सवय आहे. जनतेनेच बघावे काय चाललंय काय नाही असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.