पार्थ पवारांचे मौन कायम, गाठीभेटींचे सत्र सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 05:27 AM2020-08-16T05:27:27+5:302020-08-16T06:33:07+5:30
पवार कुटुंबात एकोपाच असतो. माध्यमांनी त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांची जाहीर कानउघाडणी केल्यापासून पवार कुटुंबाबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच कण्हेरीत श्रीनिवास पवार यांच्या घरी संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र येणार असल्याने राजकीय तर्कवितर्क लढविले जात आहेत. दरम्यान, पार्थ पवारांनी ही कौटुंबिक भेट असल्याचे सांगत माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. पार्थ अजूनही नाराज आहेत का, अशी चर्चाही यानिमित्ताने रंगली.
पवार कुटुंबातील तणावाचे वातावरण येत्या दोन दिवसांत निवळेल. पार्थ पवार नाराज होणे हे स्वाभाविक आहे. मात्र, आता ते शांत आहेत.
शरद पवार हे त्यांच्या जागेवर योग्य असून पार्थ पवारही त्यांच्या जागेवर योग्य असल्याचे कुटुंबातील सदस्यांकडून सांगण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पवार कुटुंबात वाद असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फेटाळला आहे. पवार कुटुंबात एकोपाच असतो. माध्यमांनी त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.
>एकत्र बसून एका मिनिटात प्रश्न सोडवतील - राजेश टोपे
शरद पवार, अजित पवार आणि पार्थ पवार एकत्र बसून एका मिनिटात हा विषय संपवतील, असे विधान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
>पवार कुटुंबाचा अंतर्गत विषय - देवेंद्र फडणवीस
पवार कुटुंबीयांचा हा अंतर्गत विषय आहे. यात आम्हाला पडायचे नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.