मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारल्याने नाराज असणारे पार्थ पवार कुटुंबातील नातेवाईकांची भेट घेत होते. यामध्ये पार्थ यांची काका श्रीनिवास पवार यांच्या 'अनंतारा ' निवासस्थानी बैठक झाली. त्यामध्ये पार्थ यांची समजूत घालण्यात आल्याची चर्चा आहे. या चर्चेबाबत' लोकमत'शी बोलताना पार्थ यांच्या काकू शर्मिला पवार यांनी सगळं व्यवस्थित असल्याचं म्हटलंय. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांनीही हा अतिशय छोटा विषय असल्याचे म्हटले. तसेच, काका विरुद्ध पुतण्या या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे नागपुरात आले होते, त्यावेळी पत्रकारांशी बोलताना पटेल यांनी पार्थ विषयावरही स्पष्टीकरण दिलं. ''प्रिंट आणि टेलिव्हीजन मीडियात गेल्या 3 ते 4 दिवसांत जे पाहतोय, त्यात अजिबात काहीच नाही. पार्थ पवार गुरुवारी सुप्रियाताई आणि शरद पवार यांना घरी जाऊन भेटूनही आले आहेत. हा विषय अतिशय छोटा असून मोठा राजकीय विषय बनल्याचं मला वाटत नाही. तसेच मी जबाबदारीने सांगतो की, अजित पवार vs शरद पवार ही फालतू चर्चा सुरू असून त्यामध्ये कुठलेही तथ्य नाही,'' असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टच सांगितले.
काका-पुतण्याच्या प्रश्नावर बोलताना, ही फॅमिली पार्टी नाही. आम्ही सगळे या पार्टीमध्ये आहोत, राष्ट्रवादी पार्टीमध्ये प्रफुल्ल पाटील आहे, अनिल देशमुख आहेत. आम्ही जबाबदार व्यक्ती आहोत, असे पटेल यांनी म्हटले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारल्याने नाराज असणारे पार्थ पवार कुटुंबातील नातेवाईकांची भेट घेत होते. यामध्ये पार्थ यांची काका श्रीनिवास पवार यांच्या 'अनंतारा ' निवासस्थानी बैठक झाली. यामध्ये पार्थ यांची समजूत घालण्यात आल्याची चर्चा आहे. या चर्चेबाबत' लोकमत'शी बोलताना पार्थ यांच्या काकू शर्मिला पवार यांनी सगळं व्यवस्थित असल्याचं वक्तव्य केलं आहे .
कणन्हेरी येथे पार पडलेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, श्रीनिवास पवार, आई सुनेत्रा पवार, काकी शर्मिला पवार यांची उपस्थिती होती. यामध्ये पार्थ यांची समजूत घालण्यात आल्याची चर्चा आहे. पार्थ पवार शनिवारी त्यांचे काका श्रीनिवास यांच्या निवासस्थानी दुपारी साडेतीन वाजता आले होते. मात्र, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार येणार नसल्याची माहिती मिळाली होती. मात्र, काल रात्री साडेसात वाजता अचानक अजितदादा या ठिकाणी पोहचले. या वेळी पार्थ यांची समजूत घालण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, या चर्चेत नेमकं काय घडलं, पार्थ पवार यांची नाराजी दूर झाली का? याबाबत माहिती समजू शकलेली नाही.
सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार व पार्थ पवार हे बारामतीतच
शनिवारी दुपारी पार्थ पवार बारामती त्यांच्या काकू शर्मिला पवार यांच्याकडे आले होते, यावेळी स्नेहभोजन करण्यासाठी आले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार रविवारी सायंकाळी येथील 'गोविंदबाग ' निवासस्थानी पोहचणार असल्याची माहिती पुढे येत आहे. यावेळी पार्थ शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे.
पार्थ पवारांची भूमिका राष्ट्रवादीशी विसंगत
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पार्थ पवार प्रकरण गाजत आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणावेळी पार्थ पवारांनी जाहीरपणे समर्थन करत शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात पार्थ यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावं अशी मागणी केली होती. मात्र या दोन्ही मागण्या राष्ट्रवादीच्या भूमिकेशी विसंगत असल्याने पार्थ पवार यांना शरद पवारांनी जाहिरपणे फटकारलं होतं.
शरद पवार काय म्हणाले होते?
पार्थ पवार यांच्या मागणीवर शरद पवार यांनी कठोर भूमिका घेतली होती. याविषयी शरद पवार म्हणाले की, "नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही. त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर आहे. परंतु सीबीआय चौकशी जर कोणाला करायची असेल, मी स्पष्ट सांगितलं की माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल की सीबीआय चौकशीची मागणी करावी, तर त्यालाही कोणी विरोध करायचं कारण नाही.
पार्थ पवार यांचे मौन तर गाठीभेटी सुरुच
पवार कुटुंबातील तणावाचे वातावरण येत्या दोन दिवसांत निवळेल. पार्थ पवार नाराज होणे हे स्वाभाविक आहे. मात्र, आता ते शांत आहेत. शरद पवार हे त्यांच्या जागेवर योग्य असून पार्थ पवारही त्यांच्या जागेवर योग्य असल्याचे कुटुंबातील सदस्यांकडून सांगण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पवार कुटुंबात वाद असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फेटाळला आहे. पवार कुटुंबात एकोपाच असतो. माध्यमांनी त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करू नये असे मत त्यांनी व्यक्त केले.