मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी केल्यामुळे राजकीय खळबळ उडाली. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत, असे सांगून पार्थ यांचे म्हणणे फेटाळून लावले.
तर पार्थ यांचे चुलत बंधू रोहित पवार यांनी मात्र हा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम असल्याचे सांगून पार्थ यांच्या विरोधी भूमिका घेतलीे.२७ जुलै रोजी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी पत्र दिले. ते पत्र माध्यमांकडे कसे आले याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. यामागे राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची किनार असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना, पार्थ पवार यांनी अशा पद्धतीचे पत्र देणे, यामुळे शिवसेनेत तीव्र नाराजी आहे. अजित पवार यांना सांगून पार्थ यांनी पत्र दिले होते का? की त्यांनी परस्परच हे पत्र दिले, याचीही चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाविषयी आपली नाराजी शरद पवार यांच्याकडे व्यक्त केल्याचे समजते.