पार्थ पवारांच्या राम मंदिराला शुभेच्छा; सुप्रिया सुळे म्हणाल्या ती त्यांची वैयक्तिक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 01:40 PM2020-08-10T13:40:44+5:302020-08-10T13:40:51+5:30
पार्थ पवार यांनी लिहिलेल्या राम मंदिराच्या पत्रावरुन सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारणा करण्यात आली.
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पत्र लिहून राम मंदिरावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन पार पडलं. याबाबत पार्थ पवार यांनी ट्वीट करुन राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा देणारं पत्र लिहून 'जय श्री राम'चा जयघोष केला. राम मंदिराच्या भूमिपूजनावरुन केंद्र सरकार आणि पर्यायाने मोदींना टोला लगवणाऱ्या शरद पवार यांना पार्थ यांची भूमिका पटणार का असा प्रश्नही विचारला जात आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील पार्थ पवार यांच्या पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे.
पार्थ पवार यांनी लिहिलेल्या राम मंदिराच्या पत्राबाबत सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारणा करण्यात आली. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी हे पत्र पहिल्यांदा बघते, आम्हाला ते पत्र लिहिलेलं नाही. खरंच हे लिहिलं असेल तर ती पार्थ याची वैयक्तिक भूमिका आहे. यावर पक्षाचा लोगो नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
पार्थ पवार यांनी पत्र लिहून राम मंदिरावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. यात त्यांनी सुरुवातच ‘जय श्री राम!’ म्हणून केली आहे. “अयोध्येत श्री राम जन्मभूमीचे भुमिपूजन होत आहे. श्रद्धा आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेले श्री राम अखेरीस शांतपणे आपल्या घरी येतील. हा लढा कडवट आणि प्रदीर्घ होता. अखेरीस एक पूर्ण पिढी एका ऐतिहासिक दिवसापशी येऊन ठेपली आहे. त्यामुळे आपण हिंदू श्रद्धेच्या पुनर्स्थापनेचा क्षण अनुभवणार आहोत,” असं मत व्यक्त केलं. तसेच आपण राम जन्मभूमी प्रकरणातून एक मोठा धडा शिकला पाहिजे असं आवाहनही पार्थ पवार यांनी नागरिकांना केलं होतं.
काही सत्यांचा आपल्याला विसर पडता कामा नये. या देशाच्या तरुण पिढीने राम जन्मभूमीच्या पवित्र भूमीवरुन सुरु झालेली शाब्दिक लढाई कायदेशीर आणि ऐतिहासिक पाहिली आहे. राम जन्मभूमीच्या या जुन्या प्रकरणावर लोकशाही व्यवस्थेअंतर्गत सामंजस्य आणि शांततामय मार्गाने तोडगा निघाला हेही आपण पाहिलं. यातून आपल्याला एक बोध घेता येईल. या देशाच्या ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांनी काही संस्था उभ्या केल्या. त्या संस्थांवर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि संयमाने वागले पाहिजे, असं पार्थ पवार यांनी पत्राद्वारे म्हटले होते.
Today is a historic day. Bhoomipoojan at Ayodhya today will be etched as civilisational awakening for Bharat. However, we need to steadfastly safeguard the secular fabric of our nation. We need to be gracious in this cultural victory. #JaiShreeRam
— Parth Pawar (@parthajitpawar) August 5, 2020
My thoughts: pic.twitter.com/pxhVyJS8rA
शरद पवार नेमकं काय म्हणाले होते-
कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटतं की कोरोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल. लॉकडाऊनमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील, असं शरद पवारांनी म्हटलं होते. कोरोनामुळे नागरिकांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. कोरोना संकटाता सापडलेल्या लोकांना कसं बाहेर काढायचं याबाबत आम्ही विचार करत आहोत, त्याला आम्ही प्राधान्य देत आहेत. काही लोकांना वाटत असेल मंदिर बांधून कोरोना जाईल. त्यामुळे राममंदिर बांधण्याचा त्यांनी निर्णय घेतला असावा, त्याबाबत मला माहिती नाही. राज्य आणि केंद्र सरकारने कोरोना संकटातून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. लॉकडाऊनमुळे लोकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. या परिस्थितील लोकांना मदत करण्यास प्राधन्य दिलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील, असं शरद पवारांनी म्हटलं होतं.