पार्थो दासगुप्ताची रवानगी न्यायालयीन कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:07 AM2020-12-31T04:07:31+5:302020-12-31T04:07:31+5:30
टीआरपी घोटाळा पार्थो दासगुप्ताची रवानगी न्यायालयीन कोठडीत टीआरपी घोटाळा : स्पर्धक वाहिन्यांकडील दर्शक कल विश्लेषणातून वगळला लोकमत न्यूज नेटवर्क ...
टीआरपी घोटाळा
पार्थो दासगुप्ताची रवानगी न्यायालयीन कोठडीत
टीआरपी घोटाळा : स्पर्धक वाहिन्यांकडील दर्शक कल विश्लेषणातून वगळला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टीआरपी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या पार्थो दासगुप्ताची बुधवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दासगुप्ताच्या चौकशीदरम्यान जप्त केलेल्या कागदपत्रांच्या आधारे गुन्हेगारी गुप्तवार्ता विभाग (सीआययू) अधिक तपास करत आहेत.
सीआययूच्या पथकाने मंगळवारी बार्कचे माजी सीईओ दासगुप्ता यांना ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलच्या (बार्क) कार्यालयात नेत अधिकाधिक पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी येथील कर्मचाऱ्यांकडेही पथकाने चौकशी करत महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त केली. आतापर्यंतच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीत, ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या एआरजी आऊटलायर कंपनीच्या रिपब्लिक वाहिन्यांचे ‘टीआरपी’ (टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स) वाढविण्यासाठी दासगुप्ताने बार्कची विश्लेषण पद्धत बदलली. स्पर्धक वाहिन्यांकडील दर्शक कल विश्लेषणातून वगळला. विश्लेषण न करताच टीआरपी जाहीर केल्याचा दावा गुन्हे शाखेने केला आहे. तसेच गोस्वामी यांनी त्यांना टीआरपी वाढविण्यासाठी लाखो रुपयांची लाच दिल्याचा दावाही गुन्हे शाखेने न्यायालयात केला होता.
* गोस्वामी यांचीही हाेणार चौकशी!
याच प्रकरणात गोस्वामी यांनाही चौकशीसाठी बोलाविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच जप्त केलेली कागदपत्रे, व्हाॅट्सॲप चॅटद्वारे पथक अधिक तपास करत आहे. बुधवारी दासगुप्ताला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
-------------------------