Join us  

अंशत: निकाल लावणे घातक, भालचंद्र मुणगेकर यांचे राज्यपालांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 3:16 AM

आॅगस्ट महिना उजाडल्यावरही मुंबई विद्यापीठात तब्बल १० ते १५ टक्के उत्तरपत्रिका तपासायच्या शिल्लक आहेत. तरीही निकालाची डेडलाइन चुकल्यामुळे विद्यापीठ अंशत: निकाल लावत आहे.

मुंबई : आॅगस्ट महिना उजाडल्यावरही मुंबई विद्यापीठात तब्बल १० ते १५ टक्के उत्तरपत्रिका तपासायच्या शिल्लक आहेत. तरीही निकालाची डेडलाइन चुकल्यामुळे विद्यापीठ अंशत: निकाल लावत आहे. अंशत: निकाल लावणे चुकीचे आणि विद्यार्थ्यांसाठी घातक आहे. तरीही हीच पद्धत सुरू राहणार का? हा प्रश्न माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केला आहे.मुंबई विद्यापीठात सध्या उपस्थित झालेला पेचप्रसंग हा गेल्या दोन वर्षांत कुलगुरूंना मिळालेले अमर्याद अधिकार आणि त्यांच्यावर नसलेल्या अंकुशामुळे उद्भवला आहे. मुंबई विद्यापीठाशी सुमारे ८०० महाविद्यालये संलग्न असून, या महाविद्यालयांमध्ये सुमारे सात लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तरीही कुलगुरू संजय देशमुख यांनी प्रामुख्याने परीक्षा विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहणाºया प्र-कुलगुरूंची नियुक्ती केली नाही. तेव्हा आपण हस्तक्षेप करून प्र-कुलगुरू नेमण्याचा आदेश का दिला नाही? असाही प्रश्न मुणगेकर यांनी विचारला आहे.आजही निकाल कधी जाहीर होतील, याविषयी स्पष्टता नाही; पण आता हे निकाल कधीही लागले तरी लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. उत्तरपत्रिकांच्या सदोष तपासणीमुळे जाहीर होणाºया निकालांची ‘गुणवत्ता’ काय? हा प्रश्न उरतोच. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीच्या गोंधळामुळे विद्यापीठावरील विश्वास उडला आहे. त्यामुळे हा विश्वास संपादन करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. कुलगरूंचा तत्काळ राजीनामा घेऊन नव्या कुलगुरूंची निवड-प्रक्रिया सुरू करावी.पूर्ण वेळ परीक्षा नियंत्रकाची त्वरित नियुक्ती करावी. व्यवस्थापन परिषद, विद्वात्सभा, अधिसभा, परीक्षामंडळ, अभ्यासमंडळ इ. प्राधिकरणे स्थापन करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करावी. तसेच उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून परीक्षा पद्धतीच्या अभूतपूर्व घोटाळ्याशी संबंधित सर्व बाबींची चौकशी करणे व तीन महिन्यांत त्याचा अहवाल जाहीर करावा, असे उपाय मुणगेकर यांनी खुल्या पत्रात सुचवले आहेत.