लहानग्यांच्या निरोगी आरोग्यासाठी गोवर-रुबेला लसीकरणात सहभाग घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 05:49 AM2018-12-08T05:49:37+5:302018-12-08T05:49:49+5:30
राज्यात २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या गोवर-रुबेला लसीकरणाच्या मोहिमेने तळागाळात अनेक गैरसमजुती निर्माण केल्या आहेत.
मुंबई : राज्यात २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या गोवर-रुबेला लसीकरणाच्या मोहिमेने तळागाळात अनेक गैरसमजुती निर्माण केल्या आहेत. यामुळे अनेक लहान मुले शाळेत अनुपस्थित राहणे, शाळांनी लसीकरणासाठी तारखा न देणे, पालकांनी लसीकरणासाठी परवानगी न देणे अशा घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांची संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशन (महाराष्ट्र) या संघटनेने लहानग्यांच्या निरोगी आरोग्यासाठी लसीकरणात सहभाग घ्या, असे आवाहन केले आहे.
संघटनेच्या २१० शाखांतील ४३ हजार ९० सदस्य लसीकरण मोहिमेत सक्रिय पद्धतीने काम करत आहेत.
गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महापालिका प्रशासनाने मिळून सर्व शाळांमध्ये शिक्षक-पालक संघटनांच्या सभा घेतल्या. या सभेत मोहिमेचे महत्त्व, उद्देश, लक्ष्य, वयोगट, गैरसमजुती-अफवा या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. पालकांच्या शंकांचेही निरसन करण्यात आले. पालकांच्या लेखी संमतीनंतरच लहानग्यांना गोवर-रुबेलाची लस देण्यात येत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननेही कोणत्याही गैरसमजुतींवर विश्वास न ठेवता लहानग्यांच्या आरोग्यासाठी गोवर-रुबेला लसीकरणात सहभागी होण्याचे आवाहन पालकांना करीत यासंदर्भात परिपत्रक काढले आहे.
>राज्याने गाठला ९० लाखांचा टप्पा
२७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत राज्याने अकरा दिवसांत जवळपास ९० लाखांचा टप्पा गाठला आहे. लसीकरणादरम्यान खबरदारी म्हणून लहानग्यांना इंजेक्शन दिल्यानंतर अर्धा तास वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या दोन्ही आजारांसाठी वेळीच लसीकरण करणे आवश्यक असून त्याकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये. नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना ही लस यापूर्वी दिली असली तरी अतिरिक्त संरक्षण म्हणून पुन्हा लस द्यावी, असे आरोग्य विभागाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. नऊ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या देशातील सुमारे ३ कोटी ३८ लाख बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.