मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 एप्रिल रोजी 'परीक्षा पे चर्चा' (PPC) दरम्यान विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर 1 एप्रिल रोजी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या मनातून परीक्षांची भीती घालवणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, यासाठी पंतप्रधान गेल्या 4 वर्षांपासून हा उपक्रम घेत आहेत. त्यामुळे, अभिनेता महेश कोठारे यांनीही ट्विट करुन मोदींच्या या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन विद्यार्थ्यांना केलंय.
शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय (Education Ministry) गेल्या चार वर्षांपासून परीक्षा पे पर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. त्यास देशभरातील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे मोदींचा हा कार्यक्रम पालकांसाठीही उत्साहाचा ठरत आहेत. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास बळवणारा आणि त्यांना परीक्षेच्या भीतीपासून दूर करणारा हा उपक्रम असल्याने या उपक्रमाचं अनेकांना कौतूक वाटतं. मराठमोळा अभिनेता महेश कोठारे यांनीही मोदींच्या या उपक्रमाचं कौतूक करत विद्यार्थ्यांना उद्याच्या कार्यक्रमास हजेरी लावण्याचं सूचवलं आहे. ''सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की परिक्षा सुरू होत आहेत पण अजिबात ताण घ्यायचा नाही. १ एप्रिल २०२२ पासून आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या “परिक्षा पे चर्चा” ह्या अनोख्या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि आत्मविश्वास वाढवा'', असे आवाहन महेश कोठारे यांनी विद्यार्थ्यांना केलं आहे.
दरम्यान, 16 फेब्रुवारी 2018 रोजी येथील तालकटोरा स्टेडियमवर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी पंतप्रधानांच्या संवाद कार्यक्रमाची पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर, PPC ची दुसरी आणि तिसरी आवृत्ती नवी दिल्ली येथे परस्पर 'टाउन-हॉल' स्वरूपात आयोजित करण्यात आली. गतवर्षी कोविड निर्बंधांमुळे चौथी आवृत्ती ७ एप्रिल रोजी ऑनलाइन झाली होती. तर, यावर्षी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाची पाचवी आवृत्ती तालकटोरा स्टेडियमवर 1 एप्रिल रोजी आयोजित केली जाणार आहे.