मुंबई- पालकमंत्री, मुंबई उपनगर जिल्हा यांनी दिलेल्या आदेशानुसार मुंबई महानगरात मुंबई महानगर पालिकेतर्फे दि,१ डिसेंबर ते दि,३१ डिसेंबर २०२२ दरम्यान माझी मुंबई - स्वच्छ मुंबई हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. सदर स्वच्छता अभियानाला आजपासून गोरेगाव मध्ये परिमंडळ 4 चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांनी राबविण्यास सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे आपल्या शूटिंगच्या व्यस्त कामात असतांना देखिल मराठी चित्रपट अभिनेता सुनील बर्वे आणि मराठी चित्रपट अभिनेत्री (अगडबंब चित्रपट ) तृप्ती भोईर यांनी विशेष उपस्थिती लावून, पालिकेच्या स्वच्छता कामगारांना विशेष धन्यवाद दिले.तसेच स्वतः हातात झाडू घेवून स्वच्छता कामगारां सोबत या मोहिमेत सहभाग घेतला. दोन्ही अभिनेत्यांनी सफाई कामगारांसोबत स्वतः सेल्फी फोटो काढल्याने त्यांना देखिल हुरूप आला आणि खूप मेहनत घेऊन आपला पी दक्षिण विभाग स्वच्छ करू अशी त्यांनी शपथ घेतली. आणि नागरिकांना देखील मुंबई स्वच्छ ठेवण्याची शपथ, सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांनी घ्यायला लावली.
या अभिनेत्यांच्या उपस्थितीत पी दक्षिण विभागाच्या स्वच्छता अभियानाचा उदघाटन सोहळा आज सकाळी 11 वाजता सुंदर नगर येथे आयोजित करण्यात आला होता. सदर सोहळ्यात स्थानिक आमदार विद्या ठाकूर, माजी नगरसेवक दीपक ठाकूर आणि विभागातील नागरिक, येथील विविध शाळेतील विद्यार्थी देखिल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभिनेते सुनील बर्वे आणि तृप्ती भोईर यांनी संपूर्ण मुंबई ही पालिकेच्या सफाई कामगारांमुळेच रोज स्वच्छ ब होते आणि तुमच्या मुळेच आमचे स्वास्थ चांगले रहाते असे गौरवोद्गार काढत कामगारांचे आभार मानले.पालिकेच्या स्वच्छता अभियानात नागरिकांनी सुद्धा सहभागी होवून पालिका सफाई कामगारांना सहकार्य करा व आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवा असे आवाहन केले. तर आमदार विद्या ठाकूर यांनी देखिल या अभियानाबद्धल गौरवोद्गार काढून आपला पी दक्षिण विभाग स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे नागरिकांना आवाहन केले.