मनसेचा महायुतीत सहभाग; पाडव्याला संपणार सस्पेन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 01:28 PM2024-04-08T13:28:24+5:302024-04-08T13:28:43+5:30
नुकतीच शिंदेसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी राज यांची भेटही घेतली. महायुतीत त्यांच्यासाठी रेड कार्पेट घालू असेही त्यांनी म्हटले होते
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मनसेच्या महायुतीतील सहभागाच्या चर्चा रंगल्या. यासंदर्भात राज यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. मतदारसंघांची मागणी झाली. मात्र त्यापुढे काय झाले, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. मनसे महायुतीत सहभागी होणार की नाही हा सस्पेन्स कायम असून गुढीपाडवा मेळाव्यात हा सस्पेन्स संपण्याची दाट शक्यता आहे.
नुकतीच शिंदेसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी राज यांची भेटही घेतली. महायुतीत त्यांच्यासाठी रेड कार्पेट घालू असेही त्यांनी म्हटले होते. पण महायुतीत सहभागाच्या चर्चा अचानक थांबल्या आहेत. मनसेला महायुतीत स्थान दिल्यास उत्तर भारतीय मतदार नाराज होतील, त्यामुळे चर्चा थांबली की दोन लोकसभा मतदारसंघ आणि एका राज्यसभेची मनसेने मागणी केल्याने महायुतीतील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले अशा अनेक चर्चा रंगल्या आहेत. या सर्वांवर राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्यात भाष्य करणार आहेत.
‘सांगण्याची वेळ
आता आली आहे’
गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने व्हिडिओ टीझर प्रसिद्ध केला. राज ठाकरे यांच्या आवाजातील हा व्हिडीओ आहे. ‘गेले काही आठवडे आपल्या पक्षाबद्दल चर्चा आणि तर्कवितर्क घडवले गेले आहेत. याकडे मी शांतपणे बघत होतो. तुम्हालाही अनेकांनी प्रश्न विचारून भंडावून सोडले असेल. पण आता या सगळ्यावर बोलण्याची वेळ आली आहे. नक्की काय घडतेय, घडवले जातेय हे सांगण्याची वेळ आली आहे.’ असे राज यांनी यात म्हटले आहे.
लोकसभा लढणार की विधानसभा?
महायुतीचे जागावाटप अंतिम होत आल्याने आता मनसे सहभागाची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे मनसे लोकसभा स्वबळावर लढवणार की लोकसभा न लढता थेट विधानसभेत निवडणुकांना सामोरे जाणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.