Join us

पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नव्हे, घराणेशाही मोडीत निघाली; शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 9:14 AM

बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचे आम्हीच खरे वारसदार आहोत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

Shivsena Eknath Shinde ( Marathi News ) :  निवडणूक आयोगानंतर काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच मूळ शिवसेना असल्याचा निकाल दिला. या निकालामुळे शिंदे यांच्या गोटात आनंदाचं वातावरण असून या निकालाचा आधार घेत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली आहे. "आजच्या निकालावरून एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली आहे. पक्ष स्वतःची संपत्ती समजून कोणीही मनाला वाटेल तसा निर्णय घेऊ शकत नाही. पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नव्हे, हे भानही या निकालाने दिलं आहे," अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.

उद्धव ठाकरेंनी २०१९ साली घेतलेल्या महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याच्या निर्णयाचाही एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला. "सत्तेसाठी विचारांची मोडतोड करू, अनैसर्गिक आघाड्या करून आणि विश्वास पायदळी तुडवून त्यावर ताठ मानेनं उभं राहण्याचा घोर अपराध करणाऱ्या नेत्यांना या निकालाने धडा दिला आहे," असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंवर चौफेर हल्ला, नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता याचिका आणि शिवसेना पक्षाबाबत आपला निकाल दिल्यानंतर आनंद व्यक्त करताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, "मी सर्वप्रथम राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो. आज लोकशाहीचा पुन्हा एकदा विजय झाला. २०१९मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या राज्यातील लाखो मतदारांचा आज विजय झाला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची पताका खांद्यावर घेऊन निघालेल्या शिवसैनिकाचा हा विजय आहे. बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचे आम्हीच खरे वारसदार आहोत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आजचा विजय हा सत्याचा विजय आहे. आजचा निकाल हा कुणा एका पक्षाचा विजय नसून, भारतीय संविधानाचा आणि लोकशाहीचा विजय आहे. लोकशाहीमध्ये नेहमी बहुमताला महत्त्व असते. शिवसेना हा मूळ पक्ष अधिकृतपणे निवडणूक आयोगाने आमच्याकडे दिला आहे आणि धनुष्यबाणही आमच्याकडे दिले आहे. निवडणुकीतील युतीशी फारकत घेत, सरकार दुसऱ्याबरोबर स्थापन करण्याची प्रवृत्ती ते लोकशाहीला मारक ठरणारी होती. आजच्या निकालानंतर तसे प्रकार थांबतील. आजच्या निकालावरून एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली आहे. पक्ष स्वतःची संपत्ती समजून कोणीही मनाला वाटेल तसा निर्णय घेऊ शकत नाही. पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नव्हे, हे भानही या निकालाने दिले आहे. लोकशाहीत राजकीय पक्षही लोकशाही पद्धतीनेच‌ चालले पाहिजेत, पक्षाध्यक्ष सुद्धा मनमानी करू शकत नाही , हे या निकालाने अधोरेखित केले आहे," अशा शब्दांत शिंदे यांनी या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली. 

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेबाळासाहेब ठाकरे