Join us

भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी जन्मलेल्या पक्षांना आता भूमिपुत्रच नकोसे; कोळी बांधवांच्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 4:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आधी क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडईवर मुंबई महानगरपालिकेकडून तोडक कारवाई करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आधी क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडईवर मुंबई महानगरपालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली. आणि आता दादरमधील मीनाताई ठाकरे मासळी मंडईवरदेखील तोडक कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे मुंबईतील स्थानिक भूमिपुत्र असणाऱ्या आगरी-कोळी समाजात मोठा असंतोष पसरल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी भूमिपुत्रांच्या मागण्यांकडे सत्ताधारी पक्ष दुर्लक्ष करत असल्याचे मुंबईतील कोळी बांधवांना वाटत आहे.

भूमिपुत्र व मराठी माणसांचे तारणहार म्हणून जन्माला आलेल्या व त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी जन्माला आलेल्या पक्षांना आता मुंबईतील भूमिपुत्र नकोसा झाला आहे का? अशी भावना मुंबईतील भूमिपुत्रांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोळीवाड्यांमध्ये तसेच समाजमाध्यमांवर ‘समुद्र आहे तोवर कोळी मुंबईत राहणारच’ अशा आशयाचा बोर्ड दिसून येत आहे.

मच्छिमार जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा तो मुंबई बंद करण्याची ताकद बाळगतो. परंतु त्याने कधी हे केले नाही. मच्छिमारांना मुंबईतून हद्दपार करण्याचा डाव सरकारतर्फे आखला जात आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी आणि मुंबईतील भूमिपुत्रांची संस्कृती, व्यवसाय व ओळख टिकविण्यासाठी २५ ऑगस्ट रोजी मच्छिमार जन आक्रोश मोर्चाचे आझाद मैदान आयोजन केले असल्याचे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले.

अभय म्हात्रे (माहुल गाव) - मुंबई व आसपासची शहरे येथील भूमिपुत्रांच्या जमिनीवर वसली आहेत. सरकारच्या लेखी मुंबईतील कोळीवाडे झोपडपट्ट्या आहेत. आता तर थेट येथील मासे विक्रेत्यांना दुर्गंधीचे कारण देत हद्दपार करण्यात येत आहे. याआधी देखील नवी मुंबई विमानतळाला दी. बा. पाटलांचे नाव देण्यात यावे या भूमिपुत्रांच्या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. सरकार वारंवार येथील भूमिपुत्रांना डिवचण्याचे काम करत आहे. मात्र याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.

गणेश कोळी - (कुलाबा कोळीवाडा) - सरकारचे निर्णय हे श्रीमंत व बिल्डरधार्जिणे असल्याचे त्यांच्या कृतीतून वारंवार दिसून येत आहे. मुंबईतील कोळी बांधवांकडे आजही त्यांच्या वास्तव्याचे ब्रिटिशकालीन पुरावे उपलब्ध आहेत. ब्रिटिशदेखील मुंबईतील कोळी बांधवांचा नेहमी आदर करायचे असे आमचे पूर्वज सांगतात. मात्र आता स्वतःला मराठी माणसाचे तारणहार समजणारे पक्ष विकासाच्या नावाखाली मुंबईतील भूमिपुत्रांवर अन्याय करत आहेत.