लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ईशान्य मुंबईतील रोड शोमध्ये सहभागी होत भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवला.
पंतप्रधान मोदी यांनी या रोड शो दरम्यान वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आम्ही फोडले नाहीत, त्यांच्या अंतर्गत वादाचा हा परिणाम आहे. पक्ष चोरला म्हणून ते रडत असतील तर पक्ष चोरला जात असताना ते झोपा काढत होते काय? जे आपला पक्ष सांभाळू शकत नाहीत ते देश काय सांभाळणार, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी ठाकरे-पवारांवर शरसंधान केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहीर कोटेचा, उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
ढोल-ताशे, कोळी डान्स आणि भांगडा
मावळ तालुक्यातील जवळपास २० ढोल-ताशा पथके... कोठे पंजाबी भांगडा नृत्य सुरू, तर कुठे पारंपरिक वेशातील कोळी नृत्य... काही अंतरावर बँड पथक... पुढे काही अंतरावर मल्लखांबावरील प्रात्यक्षिके... गुलाब पाकळ्यांची होणारी उधळण... रस्त्याच्या दुतर्फा उसळलेली लोकांची गर्दी... असा माहोल पंतप्रधान मोदी यांच्या रोड शोमधून पाहायला मिळाला.