अतुल कुलकर्णीमुंबई : विधानसभेची निवडणूक काँग्रेसने गांभीर्याने लढविली नाही, असा थेट आक्षेप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करण्यावरून काँग्रेसमधील मतभेदही बैठकीत समोर आले. शेतकरी कामगार कायदे रद्द करावेत, वैधानिक मंडळाची पुन्हा स्थापन करून विभागीय निधी द्यावा, अन्य आरक्षणाला धक्का न लावता मराठा, मुस्लिमांना आरक्षण द्यावे आणि मागासवर्गीयांसाठी भरीव तरतूद करावी, असे चार ठराव घेण्यात आले.
नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत ही पहिलीच बैठक होती. विधानसभेची निवडणूक आपण गंभीरपणे लढवली असती, तर आणखी जागा वाढल्या असत्या, असे भाई जगताप म्हणाले. त्यावर आम्ही महाराष्ट्रात ही निवडणूक गंभीरपणे लढविली, मुंबईत मात्र ती कशी लढली गेली, याची आम्हाला माहिती नाही, असा टोला मावळते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला.
बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आघाडीबाबतही चर्चा झाली. अशा निवडणुकांसाठी आपण स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घेतो, असे सांगत बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि थोरात यांनी तो विषय थांबविला. बाबा सिद्दीकी यांनी महाविकास आघाडी सरकारचा आमदारांना फायदा होत नाही असा आक्षेप घेतला. आमदारांनी सांगितलेल्या बदल्या होत नाहीत, छोटी-छोटी कामे अडून राहतात, असे त्यांचे म्हणणे होते. त्यावर महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी थोरात यांची बाजू घेत त्यांच्या काळात किती काम झाले हे सांगितले. पक्षाचे प्रभारी पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामाचा आढावा घेतला.
बैठकीला माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व निवड मंडळाचे सदस्य उपस्थित होते. बैठकीला माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व निवड मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
विकास मंडळांच्या निधी वितरणाचा ठराव
वैधानिक विकास मंडळांच्या माध्यमातून मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्राला निर्धारित सूत्रानुसार निधी वितरण सुनिश्चित करण्याबाबत ठराव करण्याची सूचना अशोक चव्हाण यांनी मांडली. हा ठराव मंजूरही झाला. मराठा व मुस्लिम आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी कॉंग्रेस पक्षाचा राज्य सरकारला संपूर्ण पाठिंबा असल्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला व तोदेखील संमत झाला.
प्रदेशाध्यक्ष पटोले करणार गावांत मुक्काम
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले, वैधानिक मंडळे काँग्रेसनेच आणली. भाजपने मागील पाच वर्षांत वैधानिक मंडळासाठी काही केले नाही. काही गावांत मी स्वतः मुक्काम करणार, आमचे पदाधिकारी मुक्काम करणार आणि काँग्रेसने देशासाठी काय केले हे सांगणार, असेही ते म्हणाले. संजय राठोड प्रकरणात मीडिया ट्रायल सुरू आहे. पूजाच्या कुटुंबाने तक्रार केली नाही. वस्तुस्थिती समोर आली की काँग्रेस याबाबत प्रतिक्रिया देईल, असेही पटोले म्हणाले.