शहरात पार्टी फिव्हर
By admin | Published: December 31, 2015 03:58 AM2015-12-31T03:58:30+5:302015-12-31T03:58:30+5:30
नव्या वर्षाचे स्वागत आणि जुन्या वर्षाला बाय-बाय करण्यासाठी मुंबापुरीने जय्यत तयारी केली आहे. थर्टीफर्स्टला शहरात ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यासाठी दीडशेहून अधिक
मुंबई : नव्या वर्षाचे स्वागत आणि जुन्या वर्षाला बाय-बाय करण्यासाठी मुंबापुरीने जय्यत तयारी केली आहे. थर्टीफर्स्टला शहरात ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यासाठी दीडशेहून अधिक आयोजकांनी परवाने घेतल्याची माहिती मनोरंजन आणि उत्पादन शुल्क प्रशासनाने दिली.
मुंबई शहरात मद्याचा समावेश असलेल्या ६५ हून अधिक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यासाठी बुधवारपर्यंत परवाने देण्यात आले होते. तर उपनगरात अशाच पार्ट्यांसाठी ८० हून अधिक आयोजकांनी परवाने घेतल्याचे उत्पादन शुल्क विभागाने सांगितले. त्यामुळे या वर्षीही थर्टीफर्स्टच्या नावाखाली कोट्यवधी लीटर दारू रिचवली जाणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. शिवाय मनोरंजनात्मक कार्यक्रम, डान्स, जेवण अशा विविध प्रकारे तिकीट ठेवून पार्टीचे आयोजन करण्यासाठी ३२ आयोजकांनी बुधवारपर्यंत परवानगी घेतल्याचे मनोरंजन कर विभागाने सांगितले.
थर्टीफर्स्टसाठी उत्पादन शुल्क आणि मनोरंजन कर विभागाकडून बुधवारी उशिरापर्यंत परवानगी देण्याचे काम सुरू होते. तरी थर्टीफर्स्टच्या दिवशी अर्थात गुरुवारीही अनेक आयोजक परवानगी घेण्यासाठी गर्दी करतील. त्यामुळे पार्ट्यांचा आकडा दोनशेच्या घरात जाण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)