‘पार्टी (नहीं) चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:05 AM2020-12-23T04:05:27+5:302020-12-23T04:05:27+5:30
मुंबई पोलिसांचा इशारा; मुंबईतील क्लबवर केलेल्या कारवाईनंतर केले ट्विट, क्रिकेटपटू सुरेश रैनासह बॉलीवूड कलाकारांविरुद्ध गुन्हा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई ...
मुंबई पोलिसांचा इशारा; मुंबईतील क्लबवर केलेल्या कारवाईनंतर केले ट्विट, क्रिकेटपटू सुरेश रैनासह बॉलीवूड कलाकारांविरुद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यभरात नाइट कर्फ्यू लागू करण्यात आला असतानाही, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील ड्रॅगनफ्लाय क्लबमध्ये रात्री उशिरापर्यंत धिंगाणा घालणाऱ्यांंना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. यात भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, तसेेेच बॉलीवूड सेलिब्रिटींसह एकूण ३४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर, ‘पार्टी (नहीं) चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग!’ असे ट्विट मुंबई पोलिसांनी केले आहे.
कोरोनाची साथ नियंत्रणात येत असताना, कोरोनाच्या नव्या प्रकाराने डोके वर काढले. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने, भारतातही सतर्क राहण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. राज्य सरकारकडून पब, बार, क्लब आणि रेस्टॉरंट चालकांना कडक सूचना देत, मंगळवारी रात्रीपासून ५ जानेवारीपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत नाइट कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. त्यात ड्रॅगनफ्लाय क्लब रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती मिळताच, सहार पोलिसांकडून मध्यरात्री ३ वाजता छापा टाकला. पोलिसांची छापा पडल्याचे समजताच, सर्वांचीच तारांबळ उडाली. अटकेच्या भीतीने काहीनी कारकडे धाव घेतली, तर काही जणांनी पळ काढला. पोलिसांच्या पथकाने कारला अटकाव करत, तरुणींंना बाहेर काढले. याच गर्दीत क्रिकेटपटू सुरेश रैना, अभिनेता ऋतिक रोशनची पत्नी सुझेन खान, गायक गुरु रंधवासह अनेक बड्या सेलेब्रिटीज पोलिसांच्या हाती लागल्या. त्यांच्यावर कलम १८८ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कारवाईच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन न केल्याने, तसेच वेळमर्यादा संपल्यानंतरही क्लब सुरू ठेवण्यात आल्याने कलम कारवाई करण्यात आली, तसेच क्लबच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या सर्वाना नोटीस देत सोडण्यात आले आहेत. मुंबईबाहेरून आलेल्यांंना मंगळवारी सकाळी ७च्या फ्लाइट्सने पाठविण्यात आले आहेत, असे त्यांनी नमूद केले आहे.
.....
रैना म्हणे मुंबईतील नियमाबाबत कल्पना नव्हती...
सुरेश रैना मुंबईत शूटिंगसाठी आला होता. त्यात रात्री उशीर झाल्याने सकाळी दिल्लीला परत जायचे होते. जाण्यापूर्वी त्याच्या मित्राने रात्रीच्या जेवणासाठी आग्रह केल्याने ते त्या पबमध्ये गेले. त्यांना स्थानिक नियमाबाबत कल्पना नव्हती. याबाबत समजताच त्यांनी नकळत घडलेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली. सुरेश रैना हे नेहमीच कायद्याचे पालन करतात आणि पुढेही करत राहणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांच्या व्यवस्थापन टीमकडून देण्यात आले आहे.