भयाण वास्तव! कचरा गोळा करण्यासाठी लागतो पास; तो मिळविण्यासाठी होतो जिवाचा कचरा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 08:19 AM2022-03-06T08:19:02+5:302022-03-06T08:19:28+5:30

महापालिका ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची निर्ढावलेली मनं या असल्या शब्दांनी कधीच पाझरलेली नाहीत. पास मिळत नाही म्हणून कचरा गोळा होत नाही. तो नाही तर पैसा नाही.

Pass needs to collect garbage, hectic to do this; BMC's Dumping ground realty Mafia | भयाण वास्तव! कचरा गोळा करण्यासाठी लागतो पास; तो मिळविण्यासाठी होतो जिवाचा कचरा

भयाण वास्तव! कचरा गोळा करण्यासाठी लागतो पास; तो मिळविण्यासाठी होतो जिवाचा कचरा

googlenewsNext

- सचिन लुंगसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : डम्पिंग ग्राउंडवर कचरा वेचण्यासाठी महापालिका पास देते. मात्र, तो मिळविताना या कष्टकऱ्यांच्या अवहेलनेचे सगळे पदर पुरते फाटून जातात. लोकांचा कचरा गोळा करताकरता जिवाचा पुरता कचरा होऊन जातो. हे भयाण वास्तव मुंबईच्या पूर्व उपनगरातील देवनार डम्पिंग ग्राउंड या सगळ्यात मोठ्या कचराघराचे आहे. आता तेच बंद करण्याचा घाट घातला जात आहे. तसे झाल्यास या कामावर विसंबून असणारे १० ते १२ हजार लोक रस्त्यावर येतील, तर काहींना जीवही गमवावा लागेल.

महापालिका ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची निर्ढावलेली मनं या असल्या शब्दांनी कधीच पाझरलेली नाहीत. पास मिळत नाही म्हणून कचरा गोळा होत नाही. तो नाही तर पैसा नाही. मुंबईकर पैसा खर्चून मौजमजेत कचरा करतात आणि तो गोळा करणाऱ्यांना स्वत:च्या पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्याचा कचरा करावा लागतो. 

काटा मारतात
देवनार येथे कचरा येण्याआधी तो बाहेरच वेगळा केला जातो. त्यामुळे आतमध्ये काम करणाऱ्या पासधारक कामगारांना कचरा मिळत नाही. जेवढा ते गोळा करतात त्यातही वजन करताना काटा मारला जातो. त्यामुळे जेथे पाचशे रुपये मिळाले पाहिजेत तेथे दीड-दोनशे रुपये मिळतात.

...तर ही माणसे मरतील
गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून दहा ते बारा हजार माणसे डम्पिंगशी जोडली गेली आहेत. ते जर डम्पिंगवर गेले नाहीत किंवा हे बंद झाले तर ही माणसे सहा महिन्यांत मरतील. कारण त्यांचे पोट कचऱ्यावर भरते आहे. त्यामुळे डम्पिंग ग्राउंड बंद होता कामा नये. डम्पिंगमुळे यांच्या आरोग्याच्या समस्या आहेत. त्वचेचे विकार आहेत. क्षयरोग, कर्करोग आहे. हे विदारक, पण वास्तव आहे.
- नसरीन शेख, कार्यकर्ता, संकल्प

कचरा गोळा करण्यात 
४५ वर्षे गेली
४५ वर्षे झाली मी कचरा वेचते आहे. मला पाचही मुलीच आहेत. त्यांचा विवाह झाला. माझा नवरा आता थकलाय. मी एकटी सकाळी जाते आणि दीडशे रुपयांचा माल (कचरा) घेऊन येते. पास असल्याशिवाय कचरा गोळा करू देत नाहीत आणि पासही देत नाहीत. आमचे वय झाले आता... आम्ही झाडाला पाणी घालू. झाडू मारू; नाही तर जगायचे कसे...
- शांता संजय सूत्रधर

डम्पिंगवर गेलो तर बिमारी लागत नाही
डम्पिंग ग्राउंडवर काम करीत होतो तेव्हा आजारपण नव्हते. आता घरात बसून आहोत तर आजारी पडतोय. गुडघे, हात-पाय दुखतात. २५ वर्षे झाली मी येथे काम करते आहे. दिवसभर काम केले तर हातात दोनशे ते तीनशे रुपये येतात. तेवढ्याने संसार कसा चालावा. डम्पिंग बंद करू नका. कारण त्याच्यावर आमच्या पोराबाळांची पोटं आहेत.    
- अंजून अन्सारी, कचरावेचक

महिलांना प्रशिक्षण द्या 
मुंबईतल्या डम्पिंग ग्राउंडवर जाता येत नसल्याने पाच ते सहा हजार कचरा कामगारांना रोजगार नाही. डम्पिंग ग्राउंड बंद झाले तर त्यांच्या पोटावर पाय येईल. एका घरात चार ते पाच व्यक्ती आहेत. त्यांच्या शिक्षणाचे, आरोग्याचे प्रश्न आहेत. त्यांच्यापर्यंत योजना आल्या पाहिजेत. महिलांना प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यांना पर्याय दिला पाहिजे. असे झाले नाही तर या लोकांना मरण अटळ आहे.    
- विनोद हिवाळे, अध्यक्ष, संकल्प

Web Title: Pass needs to collect garbage, hectic to do this; BMC's Dumping ground realty Mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.