नामांकित हॉटेलमध्ये बसून दिली क्लास वन अधिकाऱ्याची परीक्षा, मरिन विभागातील परीक्षेत गैरप्रकार; साडेआठ लाखांत उत्तरपत्रिका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 07:38 AM2023-09-13T07:38:24+5:302023-09-13T07:39:05+5:30
Marine Department Exam: केंद्र शासनाच्या मरिन विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या मरिन इंजिनीअरिंग ऑफिसर (एमईओ) या क्लास वन अधिकाऱ्याच्या सक्षमता प्रमाणपत्र परीक्षेत साडेआठ लाखांत उत्तरपत्रिका दिल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे.
- मनीषा म्हात्रे
मुंबई - केंद्र शासनाच्या मरिन विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या मरिन इंजिनीअरिंग ऑफिसर (एमईओ) या क्लास वन अधिकाऱ्याच्या सक्षमता प्रमाणपत्र परीक्षेत साडेआठ लाखांत उत्तरपत्रिका दिल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे. धक्कादायक म्हणजे यातील एका विद्यार्थ्याने मुंबईच्या नामांकित हॉटेलमध्ये बसून प्रश्नपत्रिका सोडविली. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा गैरप्रकार सुरू होता. याप्रकरणी मरिन विभागाने पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, एमआरए मार्ग पोलिसांनी २२ विद्यार्थ्यांसह २७ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
मर्केंटाईल मरिन विभाग (समुद्र वाणिज्य विभाग) इंजिनीअर ॲण्ड शिप सर्व्हेअर कम डेप्युटी डायरेक्टर जनरल या पदावर कार्यरत असलेले पूर्णाचंद्र विजयकुमार माजी (५१) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
काय आढळले?
मे. बक्षी यांच्या आउटसोर्सिंग कंपनीकडून कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या सर्वेश गडदे आणि सुरेश वाघेला यांनी कोडिंग करणे, उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका जमा करणे ही कामे केली. तपासात तन्वरच्या मोबाइलवर वाघेलाचे फोन कॉल दिसले. त्यानंतर दोघेही नॉट रिचेबल झाले.
तपास सुरू
अद्याप कुणाला अटक करण्यात आली नसून, अधिक तपास सुरू असल्याचे एमआरए मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पवार यांनी सांगितले.
- २१ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबईत एमईओच्या सक्षमता प्रमाणपत्र परीक्षा झाल्या. परीक्षेला ४२ पैकी ३७ विद्यार्थी उपस्थित होते. सुनील तन्वरकडे तीन उत्तरपत्रिका मिळाल्या.
- पडताळणीत जानेवारी २०२१ ते २१ फेब्रुवारी २०२२ दरम्यान २२ विद्यार्थी दोषी आढळले. सुनील तन्वर व सौरभ अगरवाल हे मुख्य सूत्रधार असून त्यांनी २२ विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन उत्तरपत्रिका लिहून दिल्या.
- चंदन बिरेंद्र सिंगची मदत घेतली. एवढेच नाही तर, सिंग यांनी निरज बंब या विद्यार्थ्याचा पेपर एका हॉटेलमध्ये बसून लिहिल्याचे समोर आले आहे.
- सुनील व अगरवाल यांना पेपर, उत्तरपत्रिका बाहेर देणे, त्या लिहिल्यानंतर आत घेऊन सर्वेश आणि सुरेशच्या मदतीने गठ्ठ्यात समाविष्ट करण्याची जबाबदारी होती. त्याचा अहवाल अजयप्रसाद वानखेडे यांनी चीफ एक्झामिनर ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड चीफ सर्व्हेअर व व्हिजिलन्स विभाग यांना पाठविला आहे.