मुंबई : महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२० मध्ये अंतिम निवड होऊनही नियुक्ती न मिळालेल्या उमेदवारांमध्ये असंतोष असून नियुक्ती मिळावी म्हणून हे उमेदवार मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत.
या परीक्षेत २१७ उमेदवारांची अंतिम निवड झाली होती. मात्र, दीड वर्षे होऊनही अद्याप त्यांची नियुक्ती झालेली नाही.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२० ची जाहिरात १८ मार्च २०२० रोजी प्रसिद्ध झाली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल ३१ मे २०२२ रोजी जाहीर झाला होता. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची १२ ऑगस्ट २०२२ रोजी शासनाकडे विभागवार शिफारस करण्यात आली होती. मात्र, या उमेदवारांना अद्याप नियुक्ती मिळालेली नाही.
नियुक्ती शक्य पण टाळाटाळ सुरु
सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांना (एसईबीसी) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातून लाभ देण्याचा शासन निर्णय रद्द झाला आहे. त्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे नियु्क्ती देण्यास विलंब लागत असल्याचे उमेदवारांना मंत्रालयातून सांगितले जात आहे. मात्र, इतर प्रवर्गातील १९६ उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्तीपत्र देणे शक्य असून टाळाटाळ करत असल्याचे या उमेदवारांचे म्हणणे आहे.