राज्यभरात शेकडो तरुणांची फसवणूक केल्याचा संशय, सायन पोलिसांकड़ून तपास सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सर्व सामान्य कुटुंबातील तरुणांना लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार सायनमध्ये समोर आला. यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक परिसरातील शेकडो तरुणांची फसवणूक केल्याचे समोर आले. या प्रकरणी सायन पोलीस अधिक तपास करत आहेत.
अँटॉपहिल परिसरात ५५ वर्षीय तक्रारदार महिला कुटुंबीयांसोबत राहण्यास आहेत. अशातच पाण्याची लाइन चेक करण्यासाठी येणाऱ्या पालिका कर्मचारी प्रशांत राणेसोबत ओळख झाली. त्यांच्याकडे मुलाच्या नोकरीबाबत विचारणा केली. त्यांच्यामार्फत २०१४ मध्ये त्यांची
प्रकाश तुकाराम सदाफुले (५८) सोबत ओळख झाली. त्याने मुलाला पाणीखात्यात नोकरी लावून देण्यासाठी ४ लाख रुपये भरण्यास सांगितले. बेरोजगार मुलाला पालिकेत कायमस्वरूपी नोकरी मिळणार असल्याने त्यांनी पैसे देण्यास तयारी दर्शविली. सुरुवातीला त्यांनी ५० हजार दिले. पुढे २०१६ मध्ये सदाफुले निवृत्त झाला. मात्र, काम करून देणार असल्याचे आश्वासन दिले. पुढे ठरल्याप्रमाणे पैसे दिले. २०१९ मध्ये सदाफुलेने मुलाचे काम झाले असल्याचे सांगून राजावाडी रुग्णालयात मेडिकल साठी बोलावले. २७ मे रोजी रुग्णालयात पोहोचताच तेथे त्याच्या सारखे आणखीन ५ हजार उमेदवार आल्याचे दिसून आले. त्यानंतर, सदाफुले हा सर्व मुलांना घेऊन नितिन धोत्रे गेला. त्याने धोत्रे हा पालिकेमध्ये अधिकारी असून, तो मेडिकलचे काम करून देणार असल्याचे सांगितले. मेडिकल झाल्यावर दोन महिन्यांनी मुलाचे काम झाल्याचे सांगत अपॉइन्मेंट लेटर दाखविले आणि उर्वरित पैसे देण्यास सांगितले.
पैसे देऊनही नोकरी लागत नसल्याने त्यांनी पालिकेत धाव घेतली. तेव्हा राणे यांनी सदाफुले, धोत्रे व त्यांच्या साथीदारांनी अनेक लोकांना पालिकेत नोकरीस लावतो, असे सांगून बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याचे सांगितले. त्यांनी त्याच्या घरी धाव घेतली, तेथे तो गायब असल्याचे दिसून आले. यात त्यांच्यासह आणखीन ८ जणांनी पोलिसांत तक्रार दिली.