उत्तीर्ण विद्यार्थी झाला अनुत्तीर्ण; फेरपरिक्षेचा मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 06:58 AM2018-06-28T06:58:03+5:302018-06-28T06:58:06+5:30
मोठा गाजावाजा करून मुंबई विद्यापीठाने आॅनलाइन मूल्यांकन सुरू केले खरे; मात्र वेळेवर निकाल लागू न शकल्याने तसेच आॅनलाइन मूल्यांकन गोंधळामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
खलील गिरकर
मुंबई : मोठा गाजावाजा करून मुंबई विद्यापीठाने आॅनलाइन मूल्यांकन सुरू केले खरे; मात्र वेळेवर निकाल लागू न शकल्याने तसेच आॅनलाइन मूल्यांकन गोंधळामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गोंधळाचा फटका विधि शाखेत आठव्या सत्राची परीक्षा देणाऱ्या यासिन कपाडिया या विद्यार्थ्यालाही बसला. उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती ताब्यात मिळाल्यानंतर आपण अनुत्तीर्ण नसून उत्तीर्ण आहोत, हे त्याच्या लक्षात आले. मात्र ही प्रत माहितीच्या अधिकाराअंतर्गत हाती येईपर्यंत त्याला फेरपरीक्षेचा मनस्ताप सहन करावा लागला.
कपाडिया याने २०१७ मध्ये बीएलएस, एलएलबी अभ्यासक्रमाच्या आठव्या सत्राची परीक्षा दिली. त्याचा निकाल आॅगस्टमध्ये लागला.
त्याला ज्युरीसस्प्रुडन्स या विषयात १०, कॉन्ट्रॅक्ट या विषयात २३, लँड लॉमध्ये ३२ गुण मिळाले. प्रत्यक्षात त्याला ज्युरीसस्प्रुडन्स या विषयात १० गुण केवळ पुरवणी उत्तरपत्रिकेत मिळाले होते व मुख्य उत्तरपत्रिकेमध्ये ३४ गुण मिळाले होते. म्हणजे एकूण ४४ गुण मिळाले होते. मात्र केवळ पुरवणी उत्तरपत्रिकेचे गुण नोंदविण्यात आल्याने त्याला १० गुण दाखविण्यात आले. कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याला २३ गुण दाखवण्यात आले होते. ते गुण केवळ पुरवणी उत्तरपत्रिकेमध्ये मिळाले होते. मुख्य उत्तरपत्रिकेत त्याला ४५ गुण मिळाले होते. अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याला प्रत्यक्षात ६८ गुण मिळाले होते.
विशेष म्हणजे उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती मिळवण्यासाठी कपाडियाला माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज करून लढा द्यावा लागला. त्यासाठी अपिलामध्ये थेट राज्य माहिती आयुक्तांकडे दाद मागावी लागली. त्यानंतरच त्याला छायांकित प्रत देण्यात आली.
उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन केल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळालेले गुण सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आॅनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या नावावर जमा केले जातात. हे गुण सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आॅनलाइन पद्धतीने दिले जातात. त्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होत नाही, अशी माहिती कपाडियाला माहिती अधिकाराअंतर्गत मुंबई विद्यापीठाने दिली आहे. त्यामुळे असे असताना, एखाद्या विद्यार्थ्याच्या मुख्य उत्तरपत्रिकेचे गुण अपलोड झाले नसल्याने अनुत्तीर्ण करणे कितपत योग्य आहे, विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न कपाडियाने केला आहे. उत्तरपत्रिकेची प्रत लगेच दिली असती तर पुन्हा परीक्षा देण्याची वेळ आली नसती, मानसिक त्रास सहन करावा लागला नसता, असे म्हणत त्याने संताप व्यक्त केला.
कपाडियाने या सर्व प्रकाराबाबत विद्यापीठाचा निषेध केला असून विद्यापीठाच्या आॅनलाइन मूल्यांकनाच्या प्रक्रियेमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे स्पष्ट झाल्याचा आरोप केला आहे. याबाबत मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे दाद मागण्यात येणार असून कुलगुरूंनी या प्रकरणी लक्ष घालून न्याय मिळवून न दिल्यास मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्याचा इशाराही त्याने दिला आहे.
यासंदर्भात मुंबई विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाचे उपकुलसचिव विनोदकुमार माळाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला.