बारावी पास बनला करोडपती..., बडे व्यावसायिक रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 05:59 AM2018-06-19T05:59:33+5:302018-06-19T05:59:33+5:30
केंद्र सरकारचा अधिकारी असल्याचे भासवून, मुंबईसह पुणे, हरयाणा, दिल्ली, गुरगाव या ठिकाणच्या बडे उद्योगपती, विकासक, व्यापाऱ्यांना टार्गेट करणा-या महाठगाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला
मुंबई : केंद्र सरकारचा अधिकारी असल्याचे भासवून, मुंबईसह पुणे, हरयाणा, दिल्ली, गुरगाव या ठिकाणच्या बडे उद्योगपती, विकासक, व्यापाऱ्यांना टार्गेट करणा-या महाठगाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. मिलिंद लवाटे (४४) असे आरोपीचे नाव आहे., त्याच्याकडून केंद्र सरकारच्या विविध संस्थांची बनावट ओळखपत्रे, तसेच भारत सरकार लिहिलेली कार जप्त केली गेली. बारावी पास असलेल्या लवाटेने या ठगीतून कोट्यवधीची संपत्ती जप्त केल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे.
कांदिवली परिसरात लवाटे हा दुसºया पत्नीसोबत राहतो. पहिल्या पत्नीसोबत त्याचा घटस्फोट झाला आहे. झटपट पैसा कमविण्यासाठी लवाटेने ठगीचा धंदा सुरू केला. दिंडोशी परिसरात एक संशयित इसम ‘भारत सरकार’ नाव असलेल्या गाडीतून येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय सावंत, पोलीस निरीक्षक सचिन कदम, अरविंद पवार आणि त्यांच्या पथकाने रविवारी सापळा रचला आणि लवाटेच्या कारला अडविले. त्याच्याकडे केलेल्या झडतीत केंद्र सरकारच्या विविध संस्थांची बनावट ओळखपत्रे दिसून आली, तसेच काही कागदपत्रेही मिळून आली.
लवाटे उद्योगपती, व्यावसायिक यांना फायनान्स मिळवून देण्याचे आमिष दाखवायचा. त्यानुसार, १०० किंवा २०० कोटींचे फायनान्स मिळवून देण्यासाठी सुरुवातीला त्याचे १ टक्के रक्कम तो खात्यात जमा करायला सांगत असे. रक्कम खात्यात जमा झाल्याचे सांगून तो नॉट रिचेबल होत असे. त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या संपत्तीबाबत गुन्हे शाखा तपास करत आहेत.
>सोबतीला बॉडीगार्ड
लवाटे हा सावज जाळ्यात येताच, त्याला भेटण्यासाठी ‘भारत सरकार’ लिहिलेल्या आलिशान कारसह सोबत दोन बॉडी गार्ड ठेवत होता. त्यामुळे समोरच्याचा त्याच्यावर विश्वास बसत होता.