सभागृहातून गेले अन् आकडाही चुकले; मंत्री गिरीश महाजन यांच्या कृतीवरून विरोधकांनी घेरले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 06:39 AM2022-08-18T06:39:12+5:302022-08-18T06:39:17+5:30
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधेयक क्रमांक १६ पुकारले; पण महाजन यांनी विधेयक क्रमांक १७ मांडल्याने विरोधकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले.
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेच्या कामकाजावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृह सोडून जाणे आणि परतल्यानंतर विधेयकाचा चुकविलेला आकडा यावरून त्यांच्यावर निशाणा साधण्याची संधी विरोधकांना मिळाली. महाजन यांच्यासारख्या अनुभवी मंत्र्यांनी नीट तयारी केली नव्हती का, असा मुद्दाही या निमित्ताने समोर आला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक मांडताना गिरीश महाजन यांची सभागृहातील अनुपस्थिती व नंतर विधेयकाचा चुकविलेला आकडा यामुळे शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला. अध्यक्ष विधेयके मांडण्यास सांगत असताना महाजन सभागृह सोडून गेले, त्यामुळे विरोधकांनी गदारोळ केला. तेव्हा महाजन लगेच परतले; पण त्यांनी विधेयकाचा क्रमांक चुकविला.
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधेयक क्रमांक १६ पुकारले; पण महाजन यांनी विधेयक क्रमांक १७ मांडल्याने विरोधकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले. यासंदर्भात शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र आपण पुढे गेलो आहोत, असे विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट करताच आम्ही हरकतीचा मुद्दा घेतला आहे, त्याला काही महत्त्व नाही का? असेच कामकाज रेटणार का? असा जाब विचारत भास्कर जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. या प्रस्तावावर विरोधी पक्षांकडून फक्त विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अभिनंदनाच्या ठरावावर मत मांडले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी हा अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर केला. त्यामुळे या ठरावावर बोलण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अन्य सदस्यांना परवानगी न मिळाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजी बोलून दाखविली; पण आता कामकाज पुढे गेले आहे, असे नार्वेकर म्हणाले.