प्रवाशांचे जीव जाताहेत, पण रेल्वे म्हणते ऑफिसच्या वेळा बदला; गर्दी व्यवस्थापनाकडे संघटनांनी वेधले लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 09:52 AM2024-05-01T09:52:19+5:302024-05-01T09:53:25+5:30
रेल्वेमार्ग, गाड्यांचा विस्तार, गर्दी व्यवस्थापनाकडे संघटनांनी वेधले लक्ष.
मुंबई :रेल्वे मार्गांचा विस्तार करा, ठाणे- कर्जत-कसारा या मार्गावर अतिरिक्त लोकल फेऱ्या चालवा, गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार घ्या आणि एसी लोकल चालवितानाच साध्या लोकलच्या फेऱ्यांतही वाढ करा, आदी उपाययोजना राबवण्यासाठी प्रवासी संघटनांनी वारंवार रेल्वेकडे पत्रव्यवहार केले. तसेच भेटीगाठीही घेतल्या. मात्र रेल्वे प्रशासन योजनांबाबत गंभीर नसल्याने प्रवाशांच्या अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप रेल्वे प्रवासी संघटनांनी केला. तर, यावर रेल्वे प्रशासनाने ऑफिसच्या वेळा बदलल्या तरच लोकलमधील प्रवाशांच्या गर्दीत फरक पडेल, असे म्हणत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि कुर्ला, दादर या सारख्या मोठ्या रेल्वे स्थानकांत लोकल पकडताना तसेच गर्दीतून प्रवास करताना अनेक प्रवाशांचा अपघातादरम्यान मृत्यू झाला आहे. डोंबिवली येथील तरुणाच्या आणि दिवा-कोपरदरम्यान तरुणीच्या मृत्यूनंतर लोकल प्रवासी संघटना आक्रमक झाल्या असून, लोकल फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी केली आहे.
ऑफिसच्या वेळा बदलण्याची गरज आहे. कारण रेल्वेकडून आता काहीच अपेक्षा नाहीत. कारण रेल्वे गाड्यांच्या क्षमता संपल्या आहेत. त्यामुळे उन्नत रेल्वे मार्ग बांधणे आणि ऑफिसच्या वेळा बदलणे हा उपाय आहे.- केतन शाह, सदस्य, झेडआरयूसीसी
लोकलच्या फेऱ्या वाढवा. गर्दीचे व्यवस्थापन करा. अतिरिक्त लोकल सोडा. एसी लोकलला साध्या लोकलचे डबे जोडा. या उपाययोजना रेल्वेने कराव्यात. रेल्वेने पायाभूत सेवा सुविधा वाढविल्या पाहिजेत. तर कुठे सेवा वाढण्यास मदत होईल.- दिनेश हळदणकर, रेल्वे प्रवासी
आम्ही लोकलमधील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालयांना वेळा बदलण्याचे आवाहन केले आहे. मात्र, आम्हाला कार्यालयांकडून पुरेसा प्रतिसाद मिळालेला नाही. कार्यालयांनी वेळा बदलल्या तर फरक पडेल. रेल्वे मार्गिकांचे चौपदरीकरण किवा लोकलच्या फेऱ्या वाढवणे हा दीर्घकालीन उपाय आहे; आणि आम्ही तो करतच आहोत. रेल्वे प्रवासी संघटनांनीही कार्यालयीन वेळा बदलण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. चार-पाच संघटनांचे हे काम नाही. सर्व संघटनांनी, कार्यालयांनी उपाय सुचवून त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. संघटनांकडून आलेल्या चांगल्या उपायांवर मध्य रेल्वे नक्की काम करून योग्य तोडगा काढेल.- डॉ. स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
एसी लोकलला सुरुवात होताना आम्ही त्याचे स्वागत केले. मात्र साध्या लोकलच्या जागी एसी लोकल चालवू नका, असे म्हटले होते. कारण यांचे गंभीर परिणाम होणार आहेत हे आम्ही लिहून दिले होते. मात्र रेल्वेने ऐकले नाही. रोज १० प्रवाशांचे अपघात होतात. ठाणे- कल्याण-कर्जतदरम्यान लोकल फेऱ्या वाढवा. कारण या पट्ट्यात वाहतुकीसाठी दुसरा पर्याय नाही. एसी लोकल चालवून प्रशासन सर्वसामान्य लोकांचे मुंबईत येणे बंद करत आहे.- सुभाष गुप्ता, रेल्वे प्रवासी महासंघ
महाव्यवस्थापकांनी या विषयावर बोलण्यासाठी वेळ द्यावा म्हणून आम्ही दोन दिवस भांडत आहोत. मात्र हा विषय राज्य सरकारचा आहे, असे म्हणत वेळ टाळली जात आहे. टिटवाळा- बदलापूर लोकल १५ डब्यांच्या करा. छोट्या फलाटांवर लोकल दोन वेळा थांबवा, लोकलच्या फेऱ्या वाढावा, असे कित्येकदा सांगितले आहे. तिसरी आणि चौथी मार्गिका वेळेत झाली असती तर ही वेळ आली नसती. रेल्वेला लोकांच्या जीवाचे काही पडलेले नाही. रेल्वेची हुकूमशाही सुरू आहे.- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ