मुंबई :रस्त्यांवरील खड्डे, वाहतूककोंडी या त्रासापासून प्रवाशांची सुटका व्हावी, यासाठी मध्य रेल्वेने कल्याण ते सीएसएमटी मार्गावर वातानुकूलित लोकल सुरू केली. एसी लोकलचे तिकीट दर जास्त असल्याने प्रवाशांनी याकडे पाठ फिरवली आहे.
१७ डिसेंबर २०२० ते ३ जानेवारी २०२१ याकाळात एसी लोकल प्रवासाची एकूण २६९ तिकिटे आणि ९३ पासची विक्री झाली. सुरुवातीला अवघ्या दोन प्रवाशांनी पास काढले होते. रोज सरासरी २७३ प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास केला, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
सर्वांना लोकल प्रवासाची मुभा नसल्याचा परिणाम वातानुकूलित लोकल फेऱ्यांवर दिसून येत आहे. एसी लोकल सुरू होऊन पंधरा दिवस झाले तरी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. एसी लोकल फेऱ्यांना प्रवाशांची प्रतीक्षा आहे, तरी पासधारकांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असल्याचेही दिसून आले. वातानुकूलित टॅक्सी आणि एसी रेल्वे यांच्यातील प्रवासवेळ आणि रोजचा खर्च यांची तुलना केल्यानंतर एसी लोकलचा पास स्वस्त असल्याचे स्पष्ट झाले.