प्रवासी क्षमता आहे २ हजार, तिकिटे विकली अडीच हजार; गर्दीच्या व्यवस्थापनात रेल्वेला अपयश आल्याने स्थानकात चेंगराचेंगरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 08:41 AM2024-10-28T08:41:59+5:302024-10-28T08:42:19+5:30

२२ टक्के अधिक तिकीटविक्री केली गेली, अशी माहिती रेल्वेच्याच अधिकाऱ्यांनी दिली.  

Passenger capacity is 2 thousand, tickets sold are 2500; Stampede at the station due to failure of railways in crowd management | प्रवासी क्षमता आहे २ हजार, तिकिटे विकली अडीच हजार; गर्दीच्या व्यवस्थापनात रेल्वेला अपयश आल्याने स्थानकात चेंगराचेंगरी

प्रवासी क्षमता आहे २ हजार, तिकिटे विकली अडीच हजार; गर्दीच्या व्यवस्थापनात रेल्वेला अपयश आल्याने स्थानकात चेंगराचेंगरी

मुंबई : वांद्रे टर्मिनसवरून गोरखपूरला जाणाऱ्या २२ डब्यांच्या अनारक्षित अंत्योदय एक्स्प्रेसची प्रवासी क्षमता २०३६ इतकी असतानाही २५४० तिकिटांची विक्री करण्यात आली होती. म्हणजे २२ टक्के अधिक तिकीटविक्री केली गेली, अशी माहिती रेल्वेच्याच अधिकाऱ्यांनी दिली.  

ही गाडी पूर्णपणे अनारक्षित असल्याने तिच्या तिकीटविक्रीवर कोणतेही निर्बंध नव्हते. अधिक तिकीटविक्री झाल्याने या गाडीसाठी वाढीव प्रवासी फलाटावर येतील याची कल्पना असूनही गर्दीचे व्यवस्थापन करण्यात पश्चिम रेल्वे प्रशासन अपयशी ठरले. त्यामुळेच चेंगराचेंगरी झाल्याचे म्हटले जाते.  

अधिकाऱ्यांनी सांगितले की प्लॅटफॉर्मवरील सुरक्षेची जबाबदारी कमर्शियल स्टाफ आणि सुरक्षा रक्षकांची असते. सर्व नियोजन करण्यासाठी टर्मिनसवर ते उपस्थित असतात. परंतु प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार चेंगराचेंगरीवेळी टर्मिनसवर पुरेशी कर्मचारी कुमक नव्हती. गाडी पकडण्याठी एकाचवेळी गर्दी उसळणार याचा अंदाज सुरक्षा कर्मचाऱ्यांना होता. त्यामुळे त्यांनी प्रवाशांच्या गर्दीचे व्यवस्थापन करणे आवश्यक होते. जर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गर्दी नियोजनपूर्वक हाताळली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती, असे म्हटले जाते.   

सुरक्षा रक्षक कुठे होते? 
वांद्रे टर्मिनसचा प्लॅटफॉर्म क्रमांक  १ हा होम प्लॅटफॉर्म असल्याने आत येण्यासाठी तीन गेट आहेत, तर दोन पादचारीपूल आहेत. तेथे सुरक्षा रक्षकांचे नियंत्रण नसल्याचे आढळले.

बराचवेळ रक्ताच्या थारोळ्यात जखमी 
रक्ताच्या धारोळ्यात पडलेल्या जखमींना तत्काळ मदत मिळणे अपेक्षित असतानाही ते बराचवेळ प्लॅटफॉर्मवरच विव्हळत पडले होते. रेल्वे पोलिस आणि कर्मचाऱ्यांकडे त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी स्ट्रेचरही कमी पडले. काही जखमींना चादरीतून तर काहींना पोलिसांनी खांद्यावरून रुग्णालयात नेले. 

रुळांवर चपला 
दुर्घटनेनंतर वांद्रे टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्र. १ वर आणि रुळांवर चपलांचा खच पडला होता. सफाई कर्मचाऱ्यांनी त्या चपला, काचा आणि इतर वस्तू १५ ते २० मोठ्या पिशव्यांमध्ये भरल्या. 

एलफिन्स्टनच्या चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर रेल्वेने कोणताही धडा घेतलेला नाही. समिती स्थापन करून रेल्वेने फक्त नौटंकी केली. रेल्वेच्या गैरव्यवस्थापनामुळे ही दुर्घटना घडली. 
    - सुभाष गुप्ता, 
    अध्यक्ष, रेल यात्री परिषद 

Web Title: Passenger capacity is 2 thousand, tickets sold are 2500; Stampede at the station due to failure of railways in crowd management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.