Mumbai AC Local News: मुंबईची लोकल ही प्रवाशांचा जिव्हाळ्याचा विषय. दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करतात. आपापली कार्यालये गाठण्यासाठी वेगवान आणि किफायतशीर प्रवास म्हणून मुंबई लोकलकडे ओढा प्रचंड आहे. डहाणू रोड, खोपोली, कसारापासून चाकरमानी लोकलने मुंबई गाठतात. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून अनेक उपाययोजना, सेवा, सुविधा दिल्या जातात. वातानुकूलित लोकल सेवा सुरू करून रेल्वेने प्रवाशांचा धकाधकीचा प्रवास काहीसा सुलभ केला आहे. मात्र, याच एसी लोकलला वेळापत्रकाचे ग्रहण लागलेले सध्या पाहायला मिळत आहे. एसी लोकल वेळेवर नसतात, असा प्रवाशांचा सूर अधिक तीव्र होताना दिसत आहे.
एसी लोकलची संरचना आणि अन्य गोष्टी या सामान्य लोकल ट्रेनपेक्षा भिन्न आहेत. एसी लोकलमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दरवाजे बंद होण्याची सोय आहे. गेल्या काही महिन्यांपासून एसी लोकलला मिळणारा चारकमान्यांचा प्रतिसाद वाढलेला पाहायला मिळत आहे. एसी लोकलच्या वेळा पाहून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. इतकेच नव्हे तर नामवंत उद्योगपती निरंजन हिरानंदांनी यांनाही एसी लोकलने प्रवास करण्याचा मोह आवरला नाही. मात्र, सातत्याने एसी लोकल लेट होणे यावरून प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रवास गारेगार, पण रोज लागतो लेटमार्क?
पश्चिम रेल्वेवरील एसी लोकल लेट होतात, अशा तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. सकाळी ऐन धावपळीच्या वेळेत एसी लोकल लेट असते. तर ठराविक काही वेळेच्याच एसी लोकल लेट असतात, अशा काही तक्रारी रेल्वे प्रवाशांकडून ऐकायला मिळतात. एक एसी लोकल लेट झाली की, पुढे सगळी गणिते बिघतात. कार्यालय गाठण्यासाठी धावाधाव करावी लागते. एसी लोकल तिकीट दर जास्त आहेत. जादा पैसे भरूनही लोकल वेळेत नसते. सकाळ असो, दुपार असो किंवा सायंकाळ असो कोणत्याही वेळी एसी लोकल वेळेत धावत नाही, अशीही तक्रार अनेक प्रवासी करतात. एसी लोकल लेट झाली की, मागच्या जनरल लोकलचे वेळापत्रकही काही मिनिटांसाठी कोलमडते. मागून येणाऱ्या साध्या लोकलमध्ये गर्दीचे प्रमाण वाढते, असाही सूर प्रवाशांमध्ये पाहायला मिळतो.
दरम्यान, एसी लोकल लेट होण्याबाबत पश्चिम रेल्वेशी संपर्क साधला असता, एसी लोकलला वाढता प्रतिसाद ही चांगली गोष्ट आहे. एसी लोकलला दरवाजे उघड-बंद करायची यंत्रणा आहे. यामुळे स्थानकांमध्ये एसी लोकलचा थांबण्याचा कालावधी वाढतो. अनेकदा गर्दीच्या वेळेस दरवाजे बंद होण्यास उशीर होतो. ही कारणे एसी लोकलच्या विलंबाची आहेत, अशी प्रतिक्रिया जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. बाकी तांत्रिक कारणामुळे एसी लोकल विलंब होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे समजते.