एसी लोकलमध्ये हव्यात कुशन सीट, प्रवाशांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 04:14 AM2018-12-29T04:14:46+5:302018-12-29T04:15:00+5:30

पश्चिम रेल्वेमार्गावर मागील वर्षी पहिली वातानुकूलित लोकल सुरू झाली. या लोकलला नुकतेच वर्ष पूर्ण झाले. मात्र या लोकलमध्ये प्राथमिक सुविधांची कमतरता आहे

passenger demand for a cushion seat in AC Local | एसी लोकलमध्ये हव्यात कुशन सीट, प्रवाशांची मागणी

एसी लोकलमध्ये हव्यात कुशन सीट, प्रवाशांची मागणी

मुंबई : पश्चिम रेल्वेमार्गावर मागील वर्षी पहिली वातानुकूलित लोकल सुरू झाली. या लोकलला नुकतेच वर्ष पूर्ण झाले. मात्र या लोकलमध्ये प्राथमिक सुविधांची कमतरता आहे, असे प्रवाशांनी सांगितले. रेल्वे बोर्डाने एक वर्षात कोणतीही दरवाढ केली नाही; पुढील चार महिने दरवाढ करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. मात्र प्रथम श्रेणीच्या लोकलपेक्षा एसी लोकलचे भाडे जास्त असूनदेखील प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था योग्य नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. प्रथम श्रेणीमधील आसन व्यवस्था कुशन पद्धतीची आहे. त्यामुळे एसी लोकलमध्ये कुशन पद्धतीच्या सीटची सुविधा असणे आवश्यक आहे, असे प्रवाशांनी सांगितले.

एका प्रवाशाने सांगितले की, चर्चगेट ते विरार प्रवास करतो. एसी लोकलमधील सीटची व्यवस्था आणखी चांगली करणे आवश्यक आहे. कुटुंबासह एसी लोकलने प्रवास करताना जास्त तिकीट खर्च होतो. त्यामुळे तिकीट खर्चात सवलत देणे आवश्यक आहे. एसी लोकल शनिवार आणि रविवार बंद असल्याने लोकलचा वापर करता येत नाही. अन्य एका प्रवाशाच्या म्हणण्यानुसार, एसी लोकलमधील कुलिंग एकसारखे नसते. राष्ट्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार परिषदेचे सदस्य शैलेश गोयल यांनी सांगितले की, एसी लोकलमध्ये आसन व्यवस्था सुधारणे आवश्यक आहे. जेणेकरून आरामदायी प्रवास होईल.

एसी लोकलचा ऋतूनुसार वापर केला जातो. मात्र जर नॉन एसी लोकलला एसी डबे लावले तर याचा वापर सर्व ऋतूंत होईल. एसी लोकल सुरू होण्याआधी आमच्या वतीने रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा झाली होती. मात्र पुढे यासंदर्भात काही ठोस निर्णय घेतला नाही, असे विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे माजी सदस्य राजीव सिंघल यांनी सांगितले.

Web Title: passenger demand for a cushion seat in AC Local

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.