Join us

मेट्रो ३ वरून विमानतळावर जाण्यासाठी प्रवाशांची पायपीट; बस, टॅक्सी सेवा सुरू करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 1:59 PM

Mumbai Metro 3: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मेट्रो १ मार्गिकेला थेट जोडणी नसल्याची स्थिती आहे.

मुंबई :

मुंबईतील १२.६९ किमीची पहिली भुयारी मेट्रो आता प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. मात्र मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मेट्रो १ मार्गिकेला थेट जोडणी नसल्याची स्थिती आहे. त्यातून मेट्रो ३ मार्गिकेच्या स्थानकांवर उतरून विमानतळावर पोहोचण्यासाठी काही अंतर चालत जावे लागते.

मेट्रोने आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल १ आणि टर्मिनल २ जोडले आहे. त्याचबरोबर मरोळ नाका येथे मेट्रो १ मार्गिकेला भुयारी मेट्रो जोडली आहे. मात्र या तिन्ही ठिकाणी मेट्रो १ मार्गिकेची थेट जोडणी अद्याप नाही. त्यातून प्रवाशांना मेट्रोतून उतरल्यावर ५ ते १० मिनिटे चालावे लागते. विलेपार्ले येथे विमानतळाच्या टर्मिनल १ ला मेट्रो ३ जोडली आहे. मेट्रो स्थानकातून बाहेर पडल्यावर प्रवाशांना रस्ता ओलांडून टर्मिनल १ कडे जावे लागते. पश्चिम द्रुतगती मार्गाला येण्यासाठी भुयारी मार्ग केला आहे. मात्र हे अंतर काहीसे जास्त असल्याने प्रवाशांना १० मिनिटे लागतात. मेट्रो स्थानकाशेजारीच बस आणि अन्य वाहतूक साधने असल्यास प्रवास सुखकर होईल, अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करत आहेत.  

मेट्रो १ मार्गिकेच्या मरोळ नाका स्थानकावरून मेट्रो ३ मार्गिकेच्या मरोळ नाका स्थानकावर जाण्यासाठी थेट सुविधा नाही. प्रवाशांना मेट्रो ३ मार्गिकेवरील मरोळ नाका स्थानकातून बाहेर पडून पदपथावरून काही अंतर चालत जावे लागते. त्यानंतर मेट्रो १ मार्गिकेच्या स्थानकावर जिन्याने जावे लागते. मात्र यात जवळपास ८ ते १० मिनिटे लागतात. 

२० हजार जणांचा प्रवासमेट्रो ३ मार्गिकेच्या आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यातील मार्गावर दुसऱ्या दिवशी रात्री नऊ वाजेपर्यंत २० हजार ४८२ प्रवाशांनी प्रवास केला.आरे ते बीकेसी १२.६९ किमी लांबीच्या मार्गावर सोमवारपासून सेवा सुरू झाली. सोमवारी पहिल्या दिवशी या मार्गावरून १८ हजार १५ प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यात मंगळवारी आणखी भर पडली आहे.

मेट्रो ३ मार्गिकेवरून आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ ला जाण्यासाठी मोठे अंतर चालावे लागते. स्थानकाबाहेर आल्यावर रस्ता ओलांडून टर्मिनल २ कडे जावे लागते. त्यासाठी १० ते १२ मिनिटे लागतात. त्यातून मेट्रो ३ मार्गिका आणि विमानतळ यांना थेट जोडणी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या मार्गाचे काम लवकर पूर्ण करून प्रवाशांना दिलासा द्यावा. - मोहन निकम, प्रवासी

टॅग्स :मेट्रोमुंबई