प्रवासी कट्टा: मिडी बसचा प्रयोग सर्वत्र हवा; उपनगरांमध्येही विस्तार करावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 01:05 AM2020-03-12T01:05:34+5:302020-03-12T06:47:49+5:30
बेस्ट प्रशासनाच्या मिडी बससेवेमुळे गर्दीच्या पण कमी अंतरावरील प्रवाशांना याचा फायदा होत आहे.
मुंबईतील वेगवेगळ्या मार्गांवर बस प्रशासनाने मिडी बस सुरू केल्या आहेत. कमी भाडे आणि वाहतूककोंडीतून सहज मार्ग काढत अरुंद रस्त्यांतून या बस बाहेर पडत असल्याने प्रवाशांचा वेळ वाचतो आहे. त्यामुळे या बसना प्रतिसाद वाढतो आहे. पण ही सेवा फक्त दक्षिण मुंबईपुरती मर्यादित न ठेवता उपनगरे, ठाणे जिल्हा, नवी मुंबई, पनवेलपर्यंत अशा बस चालवाव्या, अशी मागणी ‘लोकमत’च्या वाचकांनी ‘प्रवासी कट्टा’ या व्यासपीठावर केली आहे.
संपूर्ण मुंबईला उपयोग व्हावा
बेस्ट प्रशासनाने छोट्या मार्गावर सुरू केलेला मिडी बससेवेचा उपक्रम अत्यंत चांगला आहे. या निर्णयामुळे बेस्ट उपक्रमाला उभारी मिळण्यास मदत होणार आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होईलच, सोबत बेस्टचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. या गोष्टी विचारात घेऊन बेस्ट प्रशासनाने मुंबईत मिडी बसचा प्रयोग सर्वत्र राबवावा. - सुयोग गोरले, प्रवासी
हाजीअली ते पायधुनी सेवा द्या
बेस्ट प्रशासनाच्या मिडी बससेवेमुळे गर्दीच्या पण कमी अंतरावरील प्रवाशांना याचा फायदा होत आहे. पण ही सेवा हाजीअली ते पायधुनी या मार्गावर उपलब्ध करावी. त्यामुळे या मार्गावरील सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा फायदा होऊन, बेस्टचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
- अनिल खरात, मुंबई
मुंबईत स्तुत्य उपक्रम
मुंबईतील चर्चगेट, दादर, वरळी व अंधेरी स्थानक (प) अशा गजबजलेल्या काही मार्गांवर मिडी एसी बसगाड्यांची सेवा सुरू करण्यात आलेली आहे व त्याला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अंधेरी पश्चिम प्रमाणेच अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी, सिप्झमुळे हा भाग अतिशय गजबजलेला आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन अंधेरी स्थानक पूर्वेपासून सिप्झ व महाकाली गुंफा या मार्गावर बेस्टने मिडी एसी बसची सेवा सुरू करावी. - प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व)
धारावीत सुविधा हवी!
बेस्टने काही स्टेशनजवळ मिडी बसची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. धारावीलाही अशाच बसची आवश्यकता आहे. कारण धारावीतून सायन, माहिम आणि माटुंगा स्टेशनला चालत जाण्यासाठी १५ ते २० मिनिटे लागतात, तर सायन आणि माटुंगा स्टेशनकडे जाण्यासाठी धारावीतून टॅक्सीवाले प्रति प्रवासी १० रुपये घेतात. मात्र, एका टॅक्सीत आठ ते दहा प्रवासी कोंबून भरतात. त्यामुळे भविष्यात अपघात होऊ शकतो. तरी धारावीतील ९० फूट रोड येथून माहिम, सायन आणि माटुंग्याला जाण्यासाठी बेस्टने मिडी बससेवा सुरू केल्यास धारावीतील लोकांना त्याचा फायदा होऊन पैसा व वेळ वाचेल. - दत्ता खंदारे, धारावी
या मार्गावर फायद्याची
गोरेगावमधील हायवेलगत असलेल्या एनएससी ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात वेगवेगळी प्रदर्शने भरवली जातात. तेथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला एस. व्ही. रोड किंवा लिंक रोडला जायचे झाल्यास, तेथून कोणतीही वाहन व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे पायी प्रवास करावा लागतो. त्यासाठी मिडी बससेवा ही मार्ग क्र.(१) मृणालताई गोरे उड्डाणपुलाखालून हायवे जंक्शनपासून, राम मंदिर, बेस्टनगर, लिंक रोड गोरेगांव आगारपर्यंत, तसेच मार्ग क्र.(२)गोरेगाव लिंक रोड गोरेगाव आगारापासून बेस्टनगर, एस.व्ही.रोड ते मृणालताई गोरे उड्डाणपुलावरून बिंबीसारनगर, जयकोच, मजास आगारापर्यंत परतीचा नवीन मार्ग त्याचा फायदा प्रवाशांना होईल, तसेच मुलुंड, ठाणे, ऐरोलीला जाणाऱ्या प्रवाशांनाही हा मार्ग सोयीचा पडेल. जोगेश्वरी विक्रोळी लिंकिंग रोडवरून भरपूर कनेक्टिंग गाड्या मिळू शकतात. त्यामुळे या मार्गावर बेस्टची मिडी बससेवा उपयोगी आणि फायद्याची ठरेल. - दीपक जाधव -अध्यक्ष, लोकसेवा प्रतिष्ठान मुंबई
उपनगरांमध्येही विस्तार करावा
रेल्वेच्या लोकल सेवेनंतर बेस्ट परिवहन सेवा ही मुंबईची दुसरी लाइफलाइन समजली जाते. बेस्टच्या ताफ्यात दाखल झालेली मिडी बससेवा हा उत्तम उपक्रम आहे. आकाराने लहान व आरामदायी बैठक व्यवस्थेमुळे मुंबईकरांच्याही पसंतीस हा उपक्रम उतरत आहे. सध्या बेस्टमार्फत केलेल्या अभ्यासाअंती निवडलेले मार्ग रास्तच आहेत. यापुढील काळात नव्याने दाखल होणाºया बसेस चालविण्यासाठी रेल्वे स्थानक, बाजारपेठा व गर्दीचे मात्र कमी फेºया चालविण्यात येणारे मार्ग निवडले जावेत, तसेच या सेवेचा आणखी विस्तार करून ठाणे, नवी मुंबई या उपनगरांमध्ये जाण्यासाठी या बसेस चालविण्यात याव्यात. प्रवाशांच्या दृष्टीने किफायतशीर, पर्यावरणपूरक व आरामदायी ठरत असलेल्या बेस्टचा हा उपक्रम मुंबईच्या परिवहन सेवेतील मैलाचा दगड आहे असे वाटते. - वैभव पाटील, घणसोली
सेवा लोकाभिमुख करावी
ज्या मार्गावर जास्त प्रवासी असतील, त्या मार्गावर बेस्टने मिडी बससेवा सुरू केली आहे, पण त्या सेवेत आणखी नियमितता आणावी. ज्यादा गाड्यांचा ताफा आणून गर्दीच्या वेळेत बसेसचे प्रमाण वाढवावे. तोट्यात असणारे मार्ग बंद करीत गर्दीच्या मार्गावर, कार्यालयीन वेळा जाणून तेथे जादा मिडी बसेस सोडणे गरजेचे आहे. त्यासाठी औद्योगिक क्षेत्र, शाळा, कॉलेज, मॉल व मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकाबाहेरून फेºया सुरू केल्यास प्रवाशांच्या बरोबरीने बेस्टलाही याचा खूप फायदा होईल. मरगळलेल्या बेस्टसेवेला मिडी बससेवेमुळे नवसंजीवनी लाभली आहे, हे मात्र खरे. - कमलाकर जाधव, बोरीवली
आर्थिक उत्पन्न वाढेल
मुंबईतील ‘बेस्ट’ची तोट्याची आकडेवारी तर फारच गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत काही महिन्यांपूर्वी चालू झालेल्या मिडी बसला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अगदी अनेक बस थांब्यांवर प्रवासी खासगी टॅक्सींना नाकारून मिडी बसची वाट पाहत आहेत, तसेच ट्रॅफिकच्या समस्येतून काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. आता राज्यातही अनेक ठिकाणच्या स्वराज संस्थांनी मिडी सेवा उपलब्ध करून दिली, तर जनतेची मोठी सोय होईलच, पण आर्थिक उत्पन्नदेखील वाढेल. मात्र, कळीचा मुद्दा हा आहे की, खासगीकरण आवडे सर्वांनाच्या पार्श्वभूमीवर संबंधितांनी अशा सार्वजनिक उपक्रमांचे प्रामाणिकपणे हित जपण्याची मानसिकता ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा अशा नवीन प्रयोगांच्या नव्याची नवलाई, अल्पावधीतच संपते. - अनंत बोरसे, शहापूर जिल्हा ठाणे
चांगला प्रतिसाद मिळेल
बेस्ट प्रशासनाने मिडी बसचा चांगल्या प्रकारे वापर करून घेतला आहे. मुंबईच्या वाहतूककोंडीतून यामुळे प्रवाशांची सुटका होते आहे. जोगेश्वरी पूर्व स्टेशन परिसरात अशा बसेसची फार गरज आहे. कारण या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते, तसेच रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे प्रवाशांना मनस्ताप होतो. त्यामुळे मिडी बसचा प्रयोग येथे केल्यास प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल. - उदय वाघवणकर, जोगेश्वरी (पूर्व)
काळाचौकीला हवी सेवा
बेस्ट मिडी बसचा प्रयोग वरळी ते काळाचौकी मार्गावर व्हायला पहिजे. कारण लोअर परेलच्या ब्रिजच्या कामामुळे काळाचौकीवासीयांना तासंतास ४४ नंबर बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे प्रवाशांच्या या मागणीकडे बेस्ट प्रशासनाने लक्ष द्यावे.
- वामन राणे, काळाचौकी
सार्वत्रिकीकरण करणे आवश्यक!
सध्या मुंबईत जो मिडी बस प्रयोग चालू आहे त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण हाच प्रवास लांब पल्यासाठी करणे आवश्यक आहे. मिडी बसमुळे वेळ तर वाचत आहेच पण सर्व ठिकाणी वेळेवर मदत होत आहे. मुंबईबाहेर पनवेल आणि कल्याण, कर्जत, कसारा पर्यंत मिडी बस सेवा सुरू केल्यास त्याचा फायदा लोकांना होईल. रविवारच्या मॅगाब्लॉकच्या दिवशी या बसेसची सुविधा आणखी वाढवावी. - अंबादास काळे, पनवेल
दीर्घकाळ प्रवाशांच्या सेवेत राहावी
मरिन लाइन्स, महालक्ष्मी स्थानकांदरम्यान मिडी बसेस सोडल्यास त्या परिसरात खासगी बसेस, टॅक्सी यांच्यामुळे होणारी वाहतूककोंडी, ध्वनिप्रदूषण टाळता येईल. सकाळी रेल्वे स्थानकांपासून अंदाजे ५ किलोमीटरपर्यंतच्या परिसरातून रेल्वे स्थानकांपर्यंत या बस चालविल्यास चांगला प्रतिसाद मिळेल. काही ठिकाणी ही बससेवा अंतिम स्थानाऐवजी मध्ये एखादा थांबा देऊन चालविल्यास सोय होऊ शकेल. या बसच्या ‘आॅपरेशनल कॉस्ट’चा ठरावीक कालावधीनंतर आढावा घेतल्यास, नफ्या-तोट्याचा अंदाज घेऊन अन्य पर्यायांची/मार्गांची निवड करता येईल. - राजन पांजरी, जोगेश्वरी
लोअर परळ-वरळी नाका सेवा द्या!
पुलाचे काम सुरू असल्याने करी रोडऐवजी लोअर परळ स्थानकापासून वरळी नाका, तसेच भायखळा, प्रभादेवी, दादर स्थानक ते वरळी नाका अशा फेऱ्यांची गरज आहे. लोअर परळ, महालक्ष्मी, भायखळा येथून वरळी नाक्याला येताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ती टाळण्यासाठी आणि अधिक फेºयांसाठी मिडी बस सोयीची आहे. भायखळा स्थानकात चार-चार बस उभ्या असल्या, तरी १५४ नंबरची बस कधीही वेळेत सुटत नाही. कोंडीचे कारण पुढे केले जाते. त्याला यातून चाप बसेल. - सुरेश सामंत, वरळी
डी बस हा बेस्टचा मुंबईच्या प्रवाशांसाठी चांगलाच उपक्रम आहे. हा उपक्रम मर्यादित न राहता इतरत्रही राबविण्यात यावा. ज्या मार्गावर वाहतुकीच्या कोंडीची समस्या आहे, त्याचबरोबर प्रवाशांची संख्या जास्त आहे, अशा डॉ. गो. देशमुख मार्ग ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, तसेच भायखळा स्थानक (प.) ते महालक्ष्मी स्थानक, डॉ. गो. देशमुख मार्ग, गोदरेज चौक, ब्रिच कँडी हॉस्पिटल, महालक्ष्मी मंदिर, हाजीअली ते भायखळा